अखिलेश यांनी शिवपालना मंत्रिपदावरून हटवले, अन्य तीन मंत्र्यांनाही घरचा रस्ता
By Admin | Published: October 23, 2016 01:01 PM2016-10-23T13:01:33+5:302016-10-23T13:10:37+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी रविवारी काका शिवपाल यादव यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळातून डच्चू दिला आहे. शिवपाल तसेच अन्य तीन मंत्र्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि 23 - समाजवादी पक्षात सुरू असलेला कौटुंबिक सत्तासंघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. या संघर्षाचे केंद्रबिंदू असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी रविवारी काका शिवपाल यादव यांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळातून डच्चू दिला आहे. शिवपाल यांच्यासह अमर सिंग यांचे विश्वासू असलेल्या अन्य तीन मंत्र्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
रविवारी साकळी अखिलेश यांनी बोलावलेल्या बैठकीत सहभागी झालेले मैनपुरीचे आमदार राजू यादव यांनी ही माहिती दिली. राजू यादव म्हणाले, अमर सिंग यांची विश्वासू माणसे पक्षातील वातावरण बिघडवत आहेत. त्यामुळे अशा माणसे आपल्या मंत्रिमंडळात नकोत, असे या बैठकीत अखिलेश यांनी सांगितले.
अखिलेश यांनी शिवपाल यादव यांच्यासह नारद राय, शादाब फातिमा आणि ओमप्रकाश सिंग यांना मंत्रिंमंडळातून डच्चू दिला आहे. त्याबरोबरच अमरसिंग यांच्या विश्वासू असलेल्या जया प्रदा यांनाही अखिलेश यांनी फिल्म विकास परिषदेवरून हटवले आहे. गेल्या महिन्यात अखिलेश यांनी शिवपाल यांच्याकडील महत्त्वाची खाती काढून घेतली होती. मात्र मुलायम सिंग यांनी मध्यस्थी करून या वादावर पडदा पाडला होता.