पराभव दिसताच अखिलेश-मुलायम तडजोडीला तयार ?
By admin | Published: January 6, 2017 02:01 PM2017-01-06T14:01:43+5:302017-01-06T14:01:43+5:30
आज सकाळी मुलायम यांचे बंधू शिवपाल यादव यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 6 - निवडणूकपूर्व सर्वेक्षण चाचण्यांनी उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाची पिछेहाट होणार असल्याचे संकेत देताच अखिलेश यादव आणि मुलायमसिंह यादव या दोन्ही गटांनी तडजोडीसाठी चर्चा सुरु केली आहे. समाजवादी पक्षातील फूट टाळण्यासाठी दोन्ही गटांमध्ये बैठकांचे सत्र सुरु झाले आहे.
आज सकाळी मुलायम यांचे बंधू शिवपाल यादव यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली तरी पूर्ण बहुमत मिळणार नसल्याचे अंदाज सर्वेक्षण चाचण्यांमधून वर्तवण्यात आले आहेत. त्यामुळे स्वतंत्र होऊन नुकसान करुन घेण्यापेक्षा समाजवादी पक्ष एकसंध राहावा त्यात फाटाफुट होऊ नये यासाठी विविध पर्याय शोधण्याचा प्रयत्न या बैठकीत झाला.
समाजवादी पक्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी अखिलेश यादव आणि मुलायमसिंह यादव या पिता-पुत्रांमध्ये संघर्ष सुरु आहे. दोघांनी आपल्या गटालाच अधिकृत समाजवादी पक्ष म्हणून मान्यता मिळावी अशी निवडणूक आयोगाकडे मागणी केली. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना 9 जानेवारीपूर्वी आपला दावा सिद्ध करण्यास सांगितले आहे.