अखिलेश यांना शहिदांच्या कुटुंबांकडून प्रत्युत्तर
By admin | Published: May 12, 2017 12:00 AM2017-05-12T00:00:24+5:302017-05-12T00:00:24+5:30
देशातील प्रत्येक भागातील जवान शहीद होतात. मग गुजरातचा एकही कसा नाही? असा सवाल करणारे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना
अहमदाबाद : देशातील प्रत्येक भागातील जवान शहीद होतात. मग गुजरातचा एकही कसा नाही? असा सवाल करणारे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना गुजरातमधील शहीद जवानांच्या कुटुंबांनी प्रत्युत्तर दिले आहे. गुजरातमधील लष्करी जवानांनी आतापर्यंत ३९ शौर्यपदके मिळविली, २० जणांनी दहशतवाद्यांशी दोन हात करताना प्राणांची आहुती दिली, तर २४ जण देशाच्या सीमांचे रक्षण करताना शहीद झाल्याची माहिती सादर करण्यात आली आहे.
१९९९ च्या कारगिल युद्धात शहीद झालेले मुकेश राठोड यांची पत्नी राजश्री यांनी म्हटले आहे की, शहीद हे एका राज्याशी नव्हे, तर संपूर्ण देशाशी जोडलेले असतात. राजश्री पाच महिन्यांच्या गर्भवती असताना त्यांचे पती शहीद झाले. आज त्यांचा मुलगा १७ वर्षांचा आहे. कॅप्टन नीलेश सोनी हे १९८७ मध्ये शहीद झाले. त्यांचे भाऊ जगदीश सोनी म्हणतात की, अखिलेश यांनी अशी विधाने करू नयेत. कुपवाडा जिल्ह्यात सीमारेषेवर सर्च आॅपरेशनदरम्यान ऋषिकेश रामानी हे अतिरेक्यांशी लढताना शहीद झाले होते. त्यांची आई गीता रामानी म्हणाल्या की, मी ऋषिकेशला जन्म दिला आणि भारतमातेने त्याचे पालनपोषण केले.
शहीद गोपाल सिंग यांचे वडील मुनीम सिंग म्हणाले की, अखिलेश हे आपल्या वडिलांचा मुलगा बनण्यात अपयशी ठरले. ते देशाचा पुत्र होऊ शकत नाहीत.
अशाच संतप्त प्रतिक्रिया अनेक कुटुंबियांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, सांबरकांठा जिल्ह्यातील कोडियावडा गावातील ६,५०० लोकसंख्येपैकी १,२०० पेक्षा अधिक जवान सशस्त्र दलात आहेत. मार्च २०१७ च्या आकडेवारीनुसार राज्यात २६ हजारांहून अधिक माजी सैनिक आहेत.
.............