अखिलेश यांनी केली मुलायम यांच्याशी चर्चा
By admin | Published: January 11, 2017 01:13 AM2017-01-11T01:13:41+5:302017-01-11T01:13:41+5:30
उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षातील ‘दंगल’ची वाटचाल आता मंगलमय वातावरणाकडे होत असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी
लखनौ : उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षातील ‘दंगल’ची वाटचाल आता मंगलमय वातावरणाकडे होत असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मंगळवारी मुलायमसिंह यांची भेट घेतली. मात्र बैठकीनतर पत्रकारांशी काहीही न बोलता ते निघून गेले. त्यामुळे ते तडजोडीला तयार आहेत का हे स्पष्ट झाले नाही.
दोन दिवसांपूर्वी कुठल्याही तडजोडीची शक्यता फेटाळणाऱ्या मुलायमसिंह यांनीच आज अखिलेश यांना चर्चेसाठी बोलाविले होते. मुलायमसिंह यांच्या निवासस्थानी ही बैठक ९० मिनिटे चालली. सपाची सत्ता आल्यास अखिलेश हेच मुख्यमंत्री असतील असा यू टर्न सोमवारी मुलायम सिंह यांनी घेतल्यानंतर पिता -पुत्रातील तणाव निवळत बोलले जात असले तरी अखिलेश यांनी काहीच बोलण्यास नकार दिल्याने पक्षाच्या नेत्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे.
अखिलेश यांचे राजकीय प्रतिस्पर्धी बनलेले काका शिवपाल यादव किंवा कुटुंंबातील भांडणाचे मूळ कारण सांगितले जात असलेले राज्यसभा सदस्य अमरसिंह हे या बैठकीला उपस्थित नव्हते.
आयोगाला माहिती नाही
दोघांमध्ये चर्चा झाली असली तरी दोन्ही गटांतर्फे निवडणूक आयोगाला समझोत्याच्या प्रयत्नांविषयी काहीच कळविलेले नाही.
निवडणूक आयोगाने दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी १३ जानेवारी हा दिवस निश्चित केला आहे.
कोणाला समाजवादी पक्ष म्हणून मान्यता द्यायची, हा निर्णय १७ जानेवारीपूर्वी घ्यायचा आहे.