अखिलेशने जिंकली सायकलची शर्यत
By admin | Published: January 16, 2017 06:49 PM2017-01-16T18:49:17+5:302017-01-16T19:44:11+5:30
समाजवादी पक्षात मुलायम सिंह यादव आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव या पिता-पुत्रातील राजकिय दंगल अखिलेश यादव यांनी जिंकली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - उत्तरप्रदेश मधील राजकिय दंगल ने आता नवे वळण घेतले आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव या पिता-पुत्रांमध्ये मागच्या काही दिवसांपासून सुरु असलेली राजकिय दंगल अखिलेश यादव यांनी जिंकली आहे. आज निवडणुक आयोगाने पक्षाच्या नावासह सायकलचे चिन्हंही अखिलेश यादव यांना दिले आहे. निवडणुक आयोगाच्या या निर्णयामुळे मुलायम सिंग यांना मोठ्ठा धक्का बसला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांच्या नेतृत्त्वात आयोगाने शुक्रवारी दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं होतं. त्यानंतर निवडणूक आयोगानं आज आपला आदेश जाहीर केला. समाजवादी पार्टीच्या तब्बल 200 आमदारांचा पाठिंबा अखिलेश यादव यांना होता.
वर्षाच्या सुरुवातालीच समाजवादी पक्षातील राजकीय दंगल समोर आली होती. मुख्यमंत्री अखिलेश यादव, पक्षाचे राज्यसभेतील खासदार राम गोपाल यादव विरुद्ध पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव, त्यांचे बंधू शिवपाल सिंह यादव आणि अमर सिंह यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. दोन्ही बाजूंनी पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा केल्याने हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला होता. आज निवडणूक आयोगाने अखिलेश यादव यांच्या बाजूने निकाल दिल्याने अखिलेश यांनी राजकीय दंगलीत बाजी मारली.
90 टक्के आमदारांचा अखिलेश यादव यांना पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचा समाजवादी पक्ष म्हणून विचार करण्यात यावा असे आम्ही निवडणूक आयोगाला सांगितल्याचे राम गोपाल यादव यांनी सांगितले होते. राम गोपाल अखिलेश यांचे काका असून, सपामध्ये यादवी सुरु झाल्यापासून ते अखिलेश यांच्यासोबत आहेत.