Akhilesh Yadav : आज नाही तर उद्या, योगी आदित्यनाथ भाजपा सोडणार?; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 05:46 PM2024-09-04T17:46:17+5:302024-09-04T17:53:17+5:30
Akhilesh Yadav And Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत आता एक नवा दावा करण्यात आला आहे. अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्र्यांच्या बुलडोझरच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये राजकारण तापलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत आता एक नवा दावा करण्यात आला आहे. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्र्यांच्या बुलडोझरच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. "आज नाही तर उद्या मुख्यमंत्र्यांना स्वतःचा पक्ष काढावाच लागेल" असं म्हटलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी गुन्ह्यातील आरोपी असलेल्या व्यक्तींची घरं, प्रॉपर्टी पाडण्याच्या वाढत्या प्रवृत्तीवर टीका केली आणि याला ‘बुलडोझर न्याय’ असं म्हटलं. हा प्रश्न सोडवण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करू, असं न्यायालयाने म्हटलं होतं. बुलडोझरच्या कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अखिलेश यादव यांच्यात शाब्दिक युद्ध सुरूच आहे.
अखिलेश यादव यांनी योगींना खोचक टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "जर तुम्ही आणि तुमच्या बुलडोझरला एवढं यश मिळत असेल तर वेगळा पक्ष काढा आणि बुलडोझर निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवा. तुमचा भ्रम आणि माज धुळीस मिळेल. तसं पण तुमची जी सध्या परिस्थिती आहे त्यात तुम्ही भाजपात असून देखील नसल्यासारखे आहात. आज ना उद्या तुम्हाला वेगळा पक्ष काढावाच लागेल."
सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी असंही म्हटलं की, "नकाशाचाच प्रश्न असेल, तर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचा नकाशा मंजूर आहे की नाही आणि तो कधी मंजूर झाला हे सरकारने सांगायला हवे. मला हे पण सांगा किंवा पेपर दाखवा. याचा अर्थ असा आहे की तुम्ही हे जाणूनबुजून केलं आहे. ज्यांचा तुम्हाला अपमान करायचा होता आणि तुम्ही जाणूनबुजून सरकारच्या अहंकारावर बुलडोझर फिरवला आहे."