योगी आदित्यनाथ आमचे फोन टॅप करत आहेत; अखिलेश यादव यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 05:20 AM2021-12-20T05:20:19+5:302021-12-20T05:21:37+5:30
भाजप सरकार अनुपयोगी सरकार असल्याची टीका अखिलेश यादव यांनी केली आहे.
लखनौ:उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आमचे फोन टॅप करत आहेत, असा आरोप सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला. केंद्रीय संस्थांच्या बळावर विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमकाविण्याचे प्रकार सुरू आहेत, असा आरोपही त्यांनी भाजपवर केला.
सपच्या मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ यांचा उल्लेख अनुपयोगी मुख्यमंत्री असा केला. भाजप सरकार अनुपयोगी सरकार असल्याचे सांगत ते म्हणाले की, आमचे फोन टॅप केले जात आहेत आणि मुख्यमंत्री स्वत: सायंकाळी काही लोकांच्या रेकॉर्डिंग ऐकतात. पत्रकारांना ते म्हणाले की, आपणही सावध रहा. सपचे राष्ट्रीय सचिव राजीव राय यांच्या ठिकाणांवर आणि अन्य सप नेत्यांच्या घरांवर आयकर विभागाने छापे टाकले. यावर टीका करताना ते म्हणाले की, भाजपला जसजशी हरण्याची भीती त्रस्त करत राहील, तसे उत्तर प्रदेशात त्यांचे नेते, मुख्यमंत्री आणि दिल्लीहून येणाऱ्या नेत्यांची संख्या वाढत जाईल.
...तर राजकारण बदलू शकते : प्रियांका गांधी
रायबरेली : देशातील जातीयवादी राजकारणावर टीका करताना काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी म्हणाल्या की, महिलांच्या एकजुटीतून देशाचे राजकारण बदलू शकते. काँग्रेसच्या महिला सशक्तीकरण महाअभियानांतर्गत रायबरेलीत शक्ती संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, तुम्ही आम्हाला शक्ती द्या, आम्ही तुम्हाला शक्ती देऊ. आम्ही एकत्रितपणे उभे राहू, तेव्हा कोणीही आम्हाला रोखू शकत नाही. जातियवादाचे राजकारण बंद करून आम्हाला विकासाचे राजकारण करायचे आहे. लडकी हूं, लड सकती हूं, ही घोषणा देत प्रियांका गांधी यांनी महिलांना राजकारणात येऊन स्वत:ची लढाई स्वत: लढण्याचे आवाहन केले. उन्नाव आणि हाथरसचे उदाहरण देऊन त्या म्हणाल्या की, भाजप सरकारच्या काळात महिलांचा छळ झाला.