ब्रिजभूषण यांना सपाकडून तिकीट? अखिलेश यांच्या पाठोपाठ डिंपल यादवांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 03:07 PM2024-03-12T15:07:58+5:302024-03-12T15:10:30+5:30
Lok Sabha Election 2024: राजकीय पक्ष कामाला लागले असून आपापल्या परीने उमेदवारांची घोषणा केली जात आहे.
UP Lok Sabha Election: आगामी लोकसभेसाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून आपापल्या परीने उमेदवारांची घोषणा केली जात आहे. सर्वाधिक लोकसभेच्या जागा असलेल्या उत्तर प्रदेशातील निकाल देशाची सत्ता ठरवत असतो. इथून एकूण ८० खासदार निवडून जातात. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या यादीत १९५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पक्ष आता दुसरी यादी जाहीर करण्याच्या तयारीत आहे. पहिल्या यादीत भाजपने उत्तर प्रदेशातील ५१ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. भाजपने अनेक दिग्गजांची नावे यादीत समाविष्ट केली होती. त्याचबरोबर अनेक विद्यमान खासदारांच्या तिकिटांवरही कात्री लावण्यात आली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या यादीत कोणाला संधी मिळते आणि कोणाचा पत्ता कट होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कैसरगंजचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे नाव भाजपच्या पहिल्या यादीत नव्हते. अशातच ते समाजवादी पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा रंगली. ब्रिजभूषण सिंह यांना सपाकडून तिकीट मिळणार असल्याच्या चर्चांवर सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या पत्नी खासदार डिंपल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ब्रिजभूषण समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, यात काही तथ्य आहे असे मला वाटत नाही.
अखिलेश यादव यांचं मोठं विधान
माध्यमांशी बोलताना उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले की, भाजपचा एकही खासदार आमच्या संपर्कात नाही. पण तुम्ही असे म्हणत असाल तर आम्ही त्यांना नक्कीच तिकीट देऊ. अशी परिस्थिती उद्भवल्यास पत्रकाराचे म्हणणे मान्य करू. खरं तर भाजपच्या पहिल्या यादीत ब्रिजभूषण शरण सिंह यांचे नाव नसले तरी कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून पक्षाने कोणालाही उमेदवारी दिलेली नाही. पण, भाजपकडून त्यांचे तिकीट कापले जाऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र, ब्रिजभूषण यांच्या जागी पक्ष त्यांची पत्नी केतकी देवी आणि मुलगा प्रतीक भूषण सिंह यांपैकी एकाला कैसरगंजमधून उमेदवारी देऊ शकतो.
दरम्यान, महिला कुस्तीपटूंनी भाजप खासदार ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते आणि त्यांच्याविरोधात दीर्घ आंदोलन देखील केले होते. यामुळे भाजपवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीतही त्यांचे नाव नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.