अखिलेश यादव यांनी मानले मतदार, मायावतींचे आभार; योगी, मौर्य यांच्यावर केला प्रहार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 06:39 PM2018-03-14T18:39:45+5:302018-03-14T22:01:09+5:30
अखिलेश यादव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मतदार आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांचे आभार मानले आहेत.
लखनौ - गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये मिळवलेल्या दणदणीत विजयामुळे समाजवादी पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बसपासोबत निवडणूकपूर्व तडजोड करण्याचा धोरणात्मक निर्णय घेऊन विजयाची पायाभरणी करणारे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचा या विजयामुळे आत्मविश्वास दुणावला आहे. दरम्यान, अखिलेश यादव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मतदार आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांचे आभार मानले आहेत. तसेच या निकालांमधून मतदारांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्याविरोधातील रोष व्यक्त केल्याचा टोला लगावला आहे.
Main Gorakhpur aur Phulpur ki janta ko dhanyawaad dena chahta hoon. Aur Mayawati ji ka bahot aabhaar prakat karna chahta hoon: Akhilesh Yadav, SP. #UPByPollpic.twitter.com/3Aln7UrXq8
— ANI UP (@ANINewsUP) March 14, 2018
If this is the anger of people in areas of CM & Deputy CM, you can imagine the anger of the people of the rest of the country: Akhilesh Yadav, SP. #UPByPollpic.twitter.com/5nTlOIT4hz
— ANI (@ANI) March 14, 2018
ईशान्येतील तीन राज्यांमधील ऐतिहासिक विजयानंतर भाजपाला नव्याने चढलेली विजयाची धुंदी बुधवारी उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांच्या निकालामुळे पुरती उतरली. कारण उत्तर प्रदेशच्या गोरखपूर, फुलपूर आणि बिहारच्या अररिया लोकसभा पोटनिवडणुकांचे निकाल आता जवळजवळ स्पष्ट झाले आहेत. मायावतींच्या बसपाचे पाठबळ लाभलेल्या समाजवादी पक्षाने दोन्ही मतदारसंघात भाजपाला पराभवाची चव चाखायला भाग पाडले आहे. तिनही ठिकाणी भारतीय जनता पक्ष पराभवाच्या छायेत आहे. विशेषतः गोरखपूर आणि फुलपूर मतदारसंघातला पराभव भाजपासाठी धक्कादायक आहे. या दोन्ही मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत असल्याने ही पोटनिवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची होती. यापूर्वी लोकसभा निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघात भाजपाने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता.
निकाल -
- गोरखपुरमध्ये समाजवादी पार्टीच्या प्रवीण निषाद यांनी भाजपाच्या उपेंद्र पटेल यांचा 21 हजार 881 मतांनी पराभव केलाय. येथे भाजपाला 434632 मतं तर सपाला 456513 मतं मिळाली.
- फुलपूरच्या जागेवर सपा उमेदवार नागेंद्र पटेल यांनी भाजपाच्या कौशलेंद्र पटेल यांना 59 हजार 613 मतांनी धूळ चारली.
- बिहारच्या अररिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाने मोठा विजय मिळवत भाजपाचा 61 हजार 788 मतांनी पराभव केला. येथे राजदच्या सरफराज आलम यांनी भाजपाच्या प्रदीप सिंह यांना पराभूत केले.
- याशिवाय बिहारमध्ये दोन जागांवर विधानसभा पोटनिवडणूक झाली. जहानाबाद येथेही भाजाला दणका देत राजदने विजय मिळवलाय, केवळ भभुआ येथे भाजपाच्या रिंकी पांडे या विजयी ठरल्या आहेत.