अखिलेश यादवांनी गाण्यातून उडवली नितीश कुमारांची खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2017 10:50 AM2017-07-27T10:50:15+5:302017-07-27T11:13:47+5:30
नितीश कुमार यांनी बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमधील राजकारण वेगवेगळी वळणं घेताना दिसलं.
नवी दिल्ली, दि. 27- नितीश कुमार यांनी बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बिहारमधील राजकारण वेगवेगळी वळणं घेताना दिसलं. बुधवारी संध्याकाळी नितिश कुमारांनी राजीनामा दिल्यापासून ते गुरूवारी सकाळी नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेइपर्यंत अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या तसंच आरोप-प्रत्यारोपही झाले. नितीश कुमारांनी भाजपचा रस्ता पकडल्यानंतर गुरूवारी सकाळी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ट्विटकरून नितीश कुमारांच्या निर्णयाची खिल्ली उडविली आहे. 'ना ना करते, प्यार तुम्ही से कर बैठे,' असं टि्वट करत अखिलेश यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची खिल्ली उडविली आहे.
ना ना करते, प्यार तुम्हीं से कर बैठे
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) July 27, 2017
करना था इंकार मगर इक़रार तुम्हीं से कर बैठे
Bihar Today
१९६५ मध्ये आलेल्या 'जब जब फूल खिलें' या सिनेमातील गाण्याचा आधार घेऊन अखिलेश यादव यांनी बिहारमधील राजकारणावर भाष्य केलं आहे. 'ना ना करते, प्यार तुम्हीं से कर बैठे, करना था इंकार मगर इकरार तुम्हीं से कर बैठे...बिहार टुडे' असं टि्वट करून अखिलेश यादव यांनी नितीश कुमार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. अखिलेश यादव यांनी केलेलं ट्विट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणूकीपूर्वी विरोधकांनी बैठकीचं आयोजन केलं होतं त्या बैठकीला नितीश कुमार गैरहजर राहिले. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला नितीश कुमारांनी हजेरी लावली होती. तसंच बिहारमधील सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीश कुमारांची स्तुती केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांचं ट्विट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
24 तासांच्या आत नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान
बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन बिहारमध्ये राजकीय भूकंप घडविणारे नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. विशेष म्हणजे राजीनामा देऊन चोवीस तासही उलटले नाहीत तोवर पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याचा विक्रम नितीश कुमार यांनी केला आहे. नितीश कुमार यांनी सहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. सकाळी 10 वाजता राजभवानात त्यांचा शपथविधी पार पडला. नितीश कुमार यांच्यासोबत सुशील मोदी यांचाही शपथविधी पार पडला. सुशील मोदी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजपा - जदयू समीकरण जुळलं असून 20 महिन्यांच्या आत बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचं सरकार स्थापन झालं आहे. दरम्यान राजभवन परिसरात जमावबंदी लागू करण्यात आल्याने आरजेडीने आयोजित केलेला मोर्चा रद्द करण्यात आला