औरंगजेबाची स्तुती करणाऱ्या अबू आझमींचा अखिलेश यादवांनी केला बचाव, म्हणाले, "निलंबित केल्याने सत्याच्या…’’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 20:30 IST2025-03-05T20:29:42+5:302025-03-05T20:30:13+5:30
Akhilesh Yadav defends Abu Azmi: मुघल बादशाहा औरंगजेब हा चांगला प्रशासक होता, असे म्हणत त्याची स्तुती करणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र अबू आझमी यांचा समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी बचाव केला आहे.

औरंगजेबाची स्तुती करणाऱ्या अबू आझमींचा अखिलेश यादवांनी केला बचाव, म्हणाले, "निलंबित केल्याने सत्याच्या…’’
मुघल बादशाहा औरंगजेब हा चांगला प्रशासक होता, असे म्हणत त्याची स्तुती करणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र अबू आझमी यांचा समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी बचाव केला आहे. तसेच निलंबनामुळे सत्याचं तोंड कुलूप लावून बंद करता येईल, असं कुणाला वाटत असेल तर तो त्याचा बालिशपणा आहे, असा टोलाही अखिलेश यादव यांनी लगावला आहे.
अबू आझमी यांनी औरंगजेब हा चांगला प्रशासक होता. तसेच औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि बर्मापर्यंत होती. त्या काळात आपला जो जीडीपी होता तो २४ टक्के होता. भारताला 'सोने की चिडिया' म्हटलं जायचं. या सगळ्या गोष्टींना मी चुकीचं म्हणू का, छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई ही सत्तेसाठी होती. ही लढाई धर्मासाठी होती हे जर कोण बोलत असेल तर ते मी मानत नाही, असा दावा अबू आझमी यांनी केला होता, या विधानांनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. तसेच आज विधानसभेत अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पारित करून त्यांना निलंबित करण्यात आले होते.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत अबू आझमी यांना उत्तर प्रदेशात पाठवा, तिथे त्यांच्यावर इलाज केला जाईल,असे विधान केले होते. त्यानंतर अखिलेश यादव यांची अबू आझमी यांचा बचाव करणारी प्रतिक्रिया समोर आली आहे. विचारसणी ही निलंबनाचा आधार बनू लागली तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पारतंत्र्यांमध्ये फारसा फरक उरणार नाही. आमचे आमदार, असो वा खासदार त्यांचा बिनधास्तपणा जबरदस्त आहे. मात्र निलंबनामुळे सत्याचा आवाज दाबता येईल, असं जर काही लोकांना वाटत असेल तर तो त्यांचा नकारात्मक विचार आणि बालीशपणा ठरेल, असा टोला अखिलेश यादव यांनी लगावला.