अखिलेश यादवांनी घराणेशाही नाकारली, म्हणाले डिंपल यादव यापुढे निवडणूक लढवणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 01:35 PM2017-09-25T13:35:10+5:302017-09-25T13:48:45+5:30
समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्यांची पत्नी आणि कन्नौज येथून खासदार डिंपल यादव यापुढे निवडणूक लढवणार नाहीत अशी घोषणा केली.
रायपूर - समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्यांची पत्नी आणि कन्नौज येथून खासदार डिंपल यादव यापुढे निवडणूक लढवणार नाहीत अशी घोषणा केली. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये यादव महासभेच्या एका कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून अखिलेश यादव आले होते. विमानतळावर पत्रकारांनी घराणेशाहीबाबत त्यांना प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली.
घराणेशाहीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना समाजवादी पक्षात घराणेशाही नाही, यापुढे माझी पत्नी डिंपल यादव निवडणूक लढवणार नाही असे अखिलेश यादव यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांशी चर्चा करताना अखिलेश यादव यांनी योगी सरकारवरही निशाणा साधला. योगी सरकारकडून विकासाच्या नावे कशी फसवणूक होते आहे हे उत्तर प्रदेशात घडणाऱ्या घटनांवरूनच स्पष्ट होते आहे. आमच्या सरकारच्या काळात आम्ही एक्स्प्रेस हायवे निर्माण केला, मात्र योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त पोकळ आश्वासने देतात. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले खरे पण त्यांचे सगळे लक्ष्य गुजरातवरच आहे. रायपूर मेट्रोचे स्वप्न पूर्ण होईल असे वाटत नाही अशीही टीका अखिलेश यादव यांनी केली.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी माझी मैत्री कायम आहे, उत्तर प्रदेशची निवडणूक आम्हाला जिंकता आली नाही तरीही आमच्या मैत्रीवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. आता छत्तीसगढमध्ये समाजवादी पार्टीचा विस्तार करण्याचे उद्दीष्ट आम्ही डोळ्यासमोर ठेवले आहे असेही यादव यांनी सांगितले.