अखिलेशसमर्थक मंत्र्याला डच्चू
By admin | Published: October 27, 2016 04:59 AM2016-10-27T04:59:56+5:302016-10-27T04:59:56+5:30
आपल्याच पक्षाच्या एका विधान परिषद सदस्याला मारहाण केल्याच्या कारणास्तव, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी मुख्यमंत्र्यांचे समर्थक असलेल्या तेजनारायण
लखनौ : आपल्याच पक्षाच्या एका विधान परिषद सदस्याला मारहाण केल्याच्या कारणास्तव, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी मुख्यमंत्र्यांचे समर्थक असलेल्या तेजनारायण उर्फ पवनकुमार पांडे या मंत्र्याची पक्षातून बुधवारी हकालपट्टी केली. पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतरही त्यांना अखिलेश यादव यांनी मंत्रिमंडळातून दूर केलेले नाही वा पांडे यांनी स्वत:हून राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे समाजवादी पक्षातील वाद संपण्याऐवजी अधिकच चिघळत चालल्याचे उघड झाले आहे.
शिवपाल यादव यांच्यासह काढलेल्या मंत्र्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याबाबत अखिलेशच निर्णय घेतील, असे मुलायमसिंग यांनी मंगळवारी म्हटले होते. मात्र, अखिलेशविरोधी गटातील प्रदेशाध्यक्ष शिवपाल यांच्यासह कोणीही आता पुन्हा मंत्री बनण्यास उत्सुक नाही. एवढेच नव्हे, तर शिवपाल यांनी त्यांना मंत्री म्हणून मिळालेला बंगलाही रिकामा करायला सुरुवात केली आहे. पांडे यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याची घोषणा शिवपाल यांनीच केली. पांडे यांनी विधान परिषद सदस्य आशू मलिक यांना मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यातच मारहाण केल्याचा आरोप आहे.
मूळचे विश्व हिंदू परिषदेचे असलेल्या आणि एकदा शिवसेनेतर्फे उत्तर प्रदेश विधानसभेते निवडून गेलेल्या पांडे यांनी काही वर्षांपूर्वी सपामध्ये प्रवेश केला. ते फैजाबादचे आमदार आहेत. बाबरी मशीद पाडण्याच्या कृतीबद्दल त्यांच्यावर खटला सुरू असून, ते दबंग नेते म्हणूनच ओळखले जातात. ते अखिलेश यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे मंत्र्याची पक्षातून हकालपट्टी करून, शिवपाल यांनी पांडे यांना नव्हे, तर अखिलेश यांनाच धक्का दिला. त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे शिवपाल यांनी पत्राद्वारे अखिलेश यांना कळविले. तरीही अखिलेश यांनी त्यांना मंत्रिपदावरून दूर केले नव्हते वा पांडे यांनीही राजीनामा दिला नव्हता. त्या दोघांची कृती ही मुलायमसिंग व शिवपाल यांच्याविरुद्धचे बंड मानले जात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
राज्यपालांना भेटले अखिलेश
अखिलेश यांनी दुपारी राज्यपाल राम नाईक यांची भेट घेतल्याने, ते पांडे यांच्या राजीनाम्याची माहिती देतील, असा अंदाज होता.
पण तसे घडले नाही. राज्यातील परिस्थिती व घडामोडींची माहिती मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिली, असे राजभवनातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रीय लोकदल यांच्याशी निवडणूक समझोता करायची तयारी, मुलायमसिंग यादव आणि त्यांचे बंधू शिवपाल
यादव यांनी सुरू केली आहे. त्यासाठी बोलणी सुरू असल्याचेही सांगण्यात आले.