अखिलेश यादव यांनी ऐकवला राहुल गांधी वाला किस्सा; मुख्यमंत्री योगींनाही हसू आवरलं नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 07:26 PM2022-05-30T19:26:21+5:302022-05-30T19:26:58+5:30
ज्या यूपीने एवढे पंतप्रधान दिले, अद्यापही देत आहे. तरीही दिल्ली आणि यूपीच्या सरकारमध्ये शिक्षणाचा असा स्तर?''
उत्तर प्रदेशच्या विधानसभेत सोमवारी अर्थसंकल्पावर चर्चा झाली. यावेळी विरोधी पक्षनेते अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी शेती, शिक्षण, आरोग्य आदी मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी अखिलेश यादव यांनी एका शाळेतील किस्साही सांगितला, तेव्हा एका मुलाने त्यांना राहूल गांधी म्हणून संबोधले होते. सपा अध्यक्षांनी हा किस्सा सांगितल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. स्वतः योगी आदित्यनाथांनाही हसू आवरता आले नाही आणि तेही मनमोकळेपणाने हसले.
अखिलेश यादव म्हणाले, ''शिक्षण निर्देशांकातील सर्वात खालच्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेशचा खालून चौथा क्रमांक लागतो. आपण दुःखी आहात, आम्हीही दु:खी आहोत. आपला उत्तर प्रदेश 25 कोटींचा आहे. ज्या यूपीने एवढे पंतप्रधान दिले, अद्यापही देत आहे. तरीही दिल्ली आणि यूपीच्या सरकारमध्ये शिक्षणाचा असा स्तर?''
शिक्षणाच्या या परिस्थितीसंदर्भात आपलीही चूक मान्य करत अखिलेश यादव म्हणाले, ''मी प्राथमिक शाळांना नेहमीच भेटी दोतो, मी एकदाच गेलो नाही. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, तेव्हाही जात होतो. मला माझ्या उणिवाही माहीत आहेत. मी एका शाळेत गेलो होतो. तेव्हा एका मुलाला विचारले, मला ओळखलं? तो म्हणाला हो ओळखलं. यानंतर, मी म्हणालो कोण आहे मी, यावर तो मुलगा म्हणाला, आपण राहुल गांधी आहात.'' हे ऐकताच, संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला. स्वतः मुख्यमंत्री योगींनाही हसू आवरता आले नाही आणि तेही मोकळ्या मनाने हसताना दिसते.