"पैसे देऊन गर्दी करतात", मोदींच्या विधानावर सपा नेत्याचा संताप; म्हणाले, "भाजपाचे बादशाह..."
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 12:22 PM2024-05-23T12:22:35+5:302024-05-23T12:31:20+5:30
Narendra Modi : नरेंद्र मोदी यांनी बुधवारी उत्तर प्रदेशातील श्रावस्तीमध्ये समाजवादी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी उत्तर प्रदेशातील श्रावस्तीमध्ये समाजवादी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. मोदी म्हणाले की, "रॅलीतील गर्दी आणि उत्साह हे स्पष्टपणे दर्शविते की सपा-काँग्रेसची इंडिया आघाडी ही पूर्णपणे कोलमडली आहे. संपूर्ण देश एकच गोष्ट म्हणत आहे, पुन्हा एकदा मोदी सरकार. काल मी एक व्हिडीओ पाहत होतो, ज्यामध्ये लोक स्टेजवर धावत आणि चढत होते."
"व्हिडीओ पाहून मी विचारलं, हा गोंधळ का सुरू आहे? तर त्यांनी सांगितलं की, सपा आणि काँग्रेसचे लोक रॅलीत लोकांना आणण्याचे कॉन्ट्रॅक्ट देतात. प्रति व्यक्ती पैसे देतात, पण त्यांनी पैसे दिले नाहीत, म्हणून लोक धावत येऊन स्टेजवर चढले. आता अशी स्थिती असलेला पक्ष तुमचं भलं कसं करू शकेल?" मोदींच्या या विधानावर सपाने प्रतिक्रिया दिली आहे. सपा प्रवक्ते मनोज यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"अखिलेश यादव यांना ऐकण्यासाठी लाखो लोक, तरुण उत्स्फूर्तपणे येत आहेत, दुसरीकडे भाजपाचे बादशाह बिथरले आहे कारण त्यांच्या सभांमध्ये खुर्च्या रिकाम्या राहिल्या आहेत, भाजपा इलेक्टोरल बाँडचे पैसे वाटप करत आहे आणि मोदीजी विरोधी पक्षांवर आरोप करत आहेत" असं मनोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदींच्या विधानावर आता काँग्रेसने देखील प्रतिक्रिया दिली आहे. "मंगळसूत्र, म्हशीनंतर आज नरेंद्र मोदी म्हणाले- इंडिया आघाडीतील लोक तुमची बँक खाती बंद करून तुमचे पैसे काढून घेतील, तुमच्या घराचे वीज कनेक्शन कापून अंधार करतील. आता मला त्यांची चिंता वाटत आहे, ही पराभवामुळे असलेली निराशा नाही तर त्याहून अधिक गंभीर समस्या आहे."
"काय वाटतं? आता यापुढे ते तुम्हाला म्हणतील की, तुमच्या मुलाच्या टिफिनमधून एक सँडविच खातील, मटर पनीरच्या भाजीतून पनीर काढून घेतील, मुलं खेळत असतील तर त्यांची बॅट चोरतील, कपडे सुकायला ठेवले असतील तर शर्ट घेऊन पळून जातील. दूध आणि वर्तमानपत्र घराबाहेरून गायब करतील. मंदिराच्या बाहेरून चप्पल चोरणार. हा वयाचा परिणाम आहे का? बरं, ते काहीही असलं तरी, INDIA वाले येत आहेत हे नरेंद्र मोदींनी अखेर मान्य केलं आहे" असं म्हणत काँग्रेसने प्रत्युत्तर दिलं आहे.