'भाजपाला हरवण्यासाठी काय पण'; अखिलेश यादवांनी घेतला मोठा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 11:32 AM2018-06-11T11:32:50+5:302018-06-11T11:32:50+5:30
लोकसभा निवडणुकीत समाधानकारक जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर निवडणूक लढवू, असे मायावतींनी म्हटले होते.
लखनऊ: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी वेळ पडल्यास कोणतीही तडजोड करण्याची तयारी प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दाखविली आहे. ते सोमवारी लखनऊ येथील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी अखिलेश यांनी म्हटले की, 2019 च्या निवडणुकीतही आमची बसपाशी असलेली युती कायम राहील. आम्हाला त्यांच्यासाठी जास्त जागा सोडाव्या लागल्या तरी चालेल. मात्र, भाजपाचा पराभव होईल, याची आम्ही काळजी घेऊ, असे अखिलेश यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वीच मायावती यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत समाधानकारक जागा मिळाल्या नाही तर स्वबळावर निवडणूक लढवू, असे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर अखिलेश यांनी लोकसभा निवडणुकीत कमीपणा घेण्याची तयारी दर्शविली आहे. नुकत्याच झालेल्या कैराना लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने एकत्र येत भाजपाला धूळ चारली. कैराना आणि नुरपूरमध्ये विरोधकांनी भाजपाचा पराभव केल्यावर समाजवादी पक्षाने मोठा जल्लोष केला. मात्र, या विजयानंतर मायावतींनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मायावतींच्या या मौनाचे अनेक राजकीय अर्थ काढले जात होते. मायवतींच्या भूमिकेमुळे या एकजुटीला सुरुंग लागण्याची शक्यता होती. त्यामुळे अखिलेश यांनी पुढाकार घेत ही एकजूट अबाधित ठेवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत कमी जागांवर लढण्याची तयारी दाखवल्याचे राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.
उत्तर प्रदेशात लोकसभेच्या एकूण ८० जागा आहेत. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे भाजप आघाडीला ७३ जागांवर विजय मिळाला होता. त्यात सपाला ५ आणि काँग्रेसला केवळ दोन जागांवरच विजय मिळविता आला होता. विशेष म्हणजे या निवडणुकीत बसपला खातेही खोलता आले नव्हते, मात्र बसपाच्या मतांची टक्केवारी वाढली होती. शिवाय नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसपाने जास्त जागा पटकावल्या होत्या.
Our alliance with BSP will continue, in 2019 even if we have to give up a few seats we will do it. We have to ensure BJP is defeated: Akhilesh Yadav,SP pic.twitter.com/5vq4AA9frs
— ANI UP (@ANINewsUP) June 11, 2018
World is developing rapidly, these same neighbours , Pakistan and China used to be much behind us. Today China has taken a big lead over us: Akhilesh Yadav,SP pic.twitter.com/POb88yOCAK
— ANI UP (@ANINewsUP) June 11, 2018