"भाजपाने देणगीच्या लालसेपोटी कोट्यवधी देशवासियांचा जीव धोक्यात टाकला"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 12:54 PM2024-05-09T12:54:39+5:302024-05-09T12:54:57+5:30
Akhilesh Yadav And Corona Vaccine : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. देणगीच्या लालसेपोटी भाजपाने कोट्यवधी देशवासियांचे जीव धोक्यात टाकला असं म्हणत हल्लाबोल केला आहे.
कोविशील्ड लसीच्या गंभीर दुष्परिणामांबाबत कंपनीने ब्रिटीश न्यायालयात कबुली दिल्यानंतर, एस्ट्रेजेनका ही लस बाजारातून मागे घेतली आहे. याच दरम्यान आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. देणगीच्या लालसेपोटी भाजपाने कोट्यवधी देशवासियांचे जीव धोक्यात टाकला असं म्हणत हल्लाबोल केला आहे.
अखिलेश यादव यांनी कोरोना लसीवर भाजपाला घेरलं आहे आणि म्हणाले की, "कोरोना लस बनवणारी कंपनी अतिरिक्त पुरवठ्याच्या बहाण्याने आपली जीवघेणी लस बाजारातून परत घेत आहे. संतप्त जनता भाजपा सरकारला विचारत आहे की, ज्यांच्या शरीरात ही धोकादायक लस पोहोचली आहे ती आता त्यांच्याकडून कशी परत घेणार?"
"कोटय़वधी रुपयांच्या देणगीच्या लालसेपोटी भाजपाने कोट्यवधी जीव धोक्यात घातले आहेत. आपल्याच देशवासियांचा जीव धोक्यात घालून भाजपा ‘जनद्रोही’ पक्ष बनला आहे." कोरोना लसीबाबत भाजपा सरकारवर निशाणा साधण्याची एकही संधी अखिलेश यादव सोडत नाहीत. प्रत्येक सभेत सपा भाजपकडून कोरोनाच्या इंजेक्शनचा बदला घेण्याचा घोषणा देत आहे.
कोविशील्ड लस बनवणाऱ्या कंपनीने अलीकडेच ब्रिटीश न्यायालयात कबूल केलं होतं की, या लसीमुळे टीटीएस थ्रोम्बोसिस थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोमचे दुर्मिळ दुष्परिणाम होऊ शकतात. यामुळे त्या व्यक्तीला रक्त गोठण्याची समस्या निर्माण होते आणि हृदयविकाराचा झटका-ब्रेन स्ट्रोक सारख्या घटना घडू शकतात. या लसीवर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मंगळवारी कंपनीने जगभरातील बाजारातून ही लस परत घेत असल्याचे जाहीर केले.