Akhilesh Yadav : अखेर ठरलं! अखिलेश यादव मैनपुरीच्या करहल मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 05:51 PM2022-01-22T17:51:05+5:302022-01-22T18:02:39+5:30
UP Assembly Election 2022 : समाजवादी पार्टीचे नेते राम गोपाल यादव यांनी दावा केला आहे की, अखिलेश यादव ‘विक्रमी’ मतांनी विजयी होतील.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Assembly Election 2022) पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. अखिलेश यादव यांनी मैनपुरीच्या करहल मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, पत्रकारांना संबोधित करताना अखिलेश यादव म्हणाले की, समाजवादी पार्टीचे सरकार आल्यास येत्या काळात 22 लाख तरुणांना आयटी क्षेत्रात रोजगार मिळेल. तर समाजवादी पार्टीचे नेते राम गोपाल यादव यांनी दावा केला आहे की, अखिलेश यादव ‘विक्रमी’ मतांनी विजयी होतील.
भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत गोरखपूर मतदारसंघातून रिंगणात उतरवल्यानंतर आता अखिलेश यादव यांनीही विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. अखिलेश यादव यांनी यापूर्वी निवडणूक लढविण्याबाबत सांगितले होते की, पार्टीची इच्छा असेल तर मी निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, अखिलेश यादव यांनी जिथून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे, ती जागा समाजवादी पार्टीचा बालेकिल्ला मानला जातो.
करहल विधानसभेच्या जागेवर समाजवादी पार्टीचे मोठे वर्चस्व आहे. ही जागा समाजवादी पार्टीची सुरक्षित जागा असल्याचे बोलले जात आहे. 1993 पासून येथे समाजवादी पार्टी सातत्याने विजयी आहे. 2002-2007 मध्ये ही जागा भाजपाने एकदाच जिंकली होती. करहल मतदारसंघ मैनपुरी जिल्ह्यात येतो, जो यादव कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते अखिलेश यादव यांच्या विजयाचा दावा करत आहेत.
चुनाव के मद्देनज़र जनता के लिए कुछ फैसले लिए गए हैं। जिसमें 300 यूनिट मुफ़्त बिजली, किसान के खेतों की सिचांई के लिए मुफ़्त बिजली दी जाएगी है। हमारी सरकार बनती है तो हम IT सेक्टर में 22 लाख नौजवानों को रोजगार देंगे: समाजवादी पार्टी प्रमुख अखिलेश यादव pic.twitter.com/xjAw5gHFYs
— ANI_HindiNews (@AHindinews) January 22, 2022
सात टप्प्यात विधानसभा निवडणूक
दरम्यान, यावेळी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागांसाठी सात टप्प्यांत निवडणुका होणार असून 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. उत्तर प्रदेशामध्ये 10 फेब्रुवारी रोजी राज्याच्या पश्चिम भागातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर मतदान होऊन विधानसभा निवडणुकीची सुरुवात होणार आहे. त्यानंतर 14 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात 55 जागांसाठी, 20 फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्यात 59 जागांसाठी, 23 फेब्रुवारीला चौथ्या टप्प्यात 60 जागांसाठी, 27 फेब्रुवारीला पाचव्या टप्प्यात 60 जागांसाठी, 3 मार्चला सहाव्या टप्प्यात 57 जागांसाठी आणि 7 मार्चला सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 54 जागांसाठी मतदान होणार आहे.