Akhilesh Yadav: "कुठेही दगड ठेवा, बाजूला लाल झेंडा ठेवा अन् मंदिर तयार", अखिलेश यादव यांचे वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 10:39 AM2022-05-19T10:39:15+5:302022-05-19T10:45:20+5:30
Akhilesh Yadav : "तेव्हा रात्रीच्या वेळी मूर्ती ठेवण्यात आल्या", बाबरी मशिदीबाबत अखिलेश यांचे मोठे विधान
अयोध्या: समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी हिंदूंच्या श्रद्धेबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. बुधवारी रामनगरी अयोध्येत पत्रकारांनी संवाद साधताना त्यांना वाराणसीच्या ज्ञानवापी सर्वेक्षणावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अखिलेश यादव म्हणाले की, "हिंदू धर्मात कुठेही दगड ठेवा, त्याला लाल रंग लावा आणि एखादा भगवा झेंडा ठेवा. तिथे लगेच मंदिर बांधले जाते," असे वक्तव्य अखिलेश यांनी केले आहे.
बाबरी मशिदीबाबत मोठं वक्तव्य
अखिलेश यादव एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी यावेळी हातवाऱ्यांमध्ये बाबरी मशिदीबाबतही मोठं वक्तव्य केलं. ते म्हणाले की, "एक काळ असा होता की, रात्रीच्या वेळी मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या." अखिलेश यादव यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपने याला समाजवादी पक्षाचे तुष्टीकरणाचे राजकारण म्हटले आहे.
हमारे हिंदू धर्म में यह है कि कहीं पर भी पत्थर रख दो, एक लाल झंडा रख दो, पीपल के पेड़ के नीचे तो मंदिर बन गया: सपा प्रमुख अखिलेश यादव, अयोध्याpic.twitter.com/nt4GYgaNfu
— ANI_HindiNews (@AHindinews) May 18, 2022
'वाराणसी प्रकरणामागे मोठे षडयंत्र'
बुधवारी अयोध्येतील पत्रकार परिषदेत अखिलेश यादव म्हणाले की, "भारतीय जनता पक्ष वाराणसीचा मुद्दा जाणूनबुजून उपस्थित करत आहे. वाराणसीच्या प्रश्नामागे मोठमोठे कारखाने विकले जात आहेत. ज्या वेळी तुम्ही-मी ज्ञानवापी मशिदीवर चर्चा करत होतो, त्याच वेळी भारतीय जनता पक्षाने एक योजना राबवली. आधी त्यांनी वन नेशन वन रेशन योजना राबवली, आता ते वन नेशन वन इंडस्ट्रियालिस्ट ही योजना चालवत आहे."
'उद्योगपतींना मोठ्या वस्तू विकल्या गेल्या'
अखिलेश यादव पुढे म्हणाले की, "देशातील उद्योगपतींना मोठ्या गोष्टी विकल्या जात आहेत. कंपन्या विकल्या जात आहेत. एलआयसी विकत आहेत, विमानतळ विक्रीवर काढले आहेत, ट्रेन विक्रीवर काढल्या आहेत. उद्योगपती हवे ते विकत घेतील, इंग्रजांनी ज्या प्रकारे डिवाइड अँड रुल केले, त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्ष डिवाइड अँड रुल करत आहे. हे तत्व हजारो वर्षे जुने आहे जे एकेकाळी इंग्रजांनी वापरले होते. भारतीय जनता पक्ष त्याच तत्वावर चालत आहे,"अशी टीका अखिलेश यांनी केली.
भाजपकडून टीकास्त्र
भाजपचे प्रदेश प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, "या विधानावरून त्यांनी निवडणूक निकालातून कोणताही धडा घेतला नसल्याचे दिसते. अखिलेश यांचे हे विधान हिंदूंचा अपमान करणारे आहे. समाजवादी पक्षाने तुष्टीकरणाची उंची गाठली, याच समाजवादी पक्षाने कारसेवकांवर गोळीबार करण्याचे काम केले होते. लाल टोपीवाल्यांची तीच टोळी चालवणारे समाजवादी पक्षाचे लोक हिंदूंना अपमानित करण्याचे काम करत आहेत. अखिलेश यादव यांनी हिंदूंची माफी मागावी लागेल."