उत्तरप्रदेशात अखिलेश यादवांची काँग्रेसशी हातमिळवणी

By admin | Published: January 6, 2017 08:53 AM2017-01-06T08:53:44+5:302017-01-06T09:05:11+5:30

पुढील आठवड्यात अखिलेश यादव आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट होणार असून त्यानंतर अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे

Akhilesh Yadav's involvement with Congress in Uttar Pradesh | उत्तरप्रदेशात अखिलेश यादवांची काँग्रेसशी हातमिळवणी

उत्तरप्रदेशात अखिलेश यादवांची काँग्रेसशी हातमिळवणी

Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 6 - उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष आणि काँग्रेस हातमिळवणी करण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात अखिलेश यादव आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट होणार असून त्यानंतर अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी सध्या परदेशात असून ते परतल्यानंतर ही भेट होणार आहे. 9 जानेवारी रोजी ही भेट होऊ शकते. या भेटीमध्ये प्रियंका गांधीही सहभागी होऊ शकतात. आपल्याला 90 ते 105 जागा मिळाव्यात यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. 
 
 
उत्तरप्रदेशात सध्या राजकीय वातावरण तापलं असून पिता - पुत्रातील कलह वाढत चालला आहे. रोज काहीतरी राजकीय उलथापालथ होत असून प्रत्येकजण वरचढ होण्याचा प्रयत्न करत आहे. उत्तरप्रदेशात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असून तारखांची घोषणा होताच आपापले डाव खेळण्यास सुरुवात झाली आहे. अखिलेश यादव यांनी प्रियंका गांधीशी बातचीत करत बैठकीचं नियोजन केलं आहे. राहुल गांधी परदेश दौ-याहून परत आले की 9 जानेवारी रोजी बैठक पार पडणार आहे. 
 
 
अखिलेश यादव यांनी आधीच 235 जागांची घोषणा केलेली आहे. त्यातील फक्त २ दोन जागेवर काँग्रेसनं विजय मिळवला होता. पण आता ते दोन्ही आमदारांनी इतर पक्षात प्रवेश केला आहे.  सपा आणि काँग्रेसने हातमिळवणी केल्याने मुस्लिम मतदारांचा पाठिंबा त्यांना मिळण्याची शक्यता आहे. अल्पसंख्यांकांमध्ये आपलं विशेष स्थान निर्माण करणा-या मायावतींना टार्गेट करण्याचा दोन्ही पक्षांचा अजेंडा असेल. मायावतींनी 401 पैकी 97 मुस्लिम उमेदवार रिंगणात उभं करण्याचा निर्णय घेतल्याचं कळत आहे. उत्तरप्रदेशात इतक्या मोठ्या संख्येने मुस्लिम उमेदवार निवडणूक लढण्याची ही पहिलीच वेळ असेल. 
 
दुसरीकडे समाजवादी पक्ष आणि निवडणूक चिन्ह असलेल्या 'सायकल'वर दावा करणा-या मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगाने दोघांनाही 9 जानेवारीपर्यंत उत्तर देण्यास सांगितलं आहे.
 
अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली बोलावण्यात आलेल्या समाजवादी पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात अखिलेश यादव यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर कुटुंबातील हा वाद निवडणूक आयोगाच्या दारात पोहोचला होता. पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात अखिलेश यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर हे अधिवेशनच मुलायम यांनी अवैध ठरविले. विनापरवानगी अधिवेशन घेणारे सपाचे महासचिव रामगोपाल यादव, पक्षाचे उपाध्यक्ष किरणमय नंदा आणि महासचिव नरेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
 
 रामगोपाल यादव यांनी बोलविलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात अखिलेश यांना सपाचे अध्यक्ष बनवून मुलायम सिंह यांना पक्षाचे सर्वोच्च नेते बनविण्याचा प्रस्तावही या वेळी मंजूर करण्यात आला. याच अधिवेशनात अमर सिंह यांची हकालपट्टी करण्यात आली; शिवाय शिवपाल यादव यांनाही प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार करून त्यांच्या जागी नरेश उत्तम पटेल यांचे नाव निश्चित करण्यात आले. मात्र, हे अधिवशेन अवैध असून, जे नेते आणि कार्यकर्ते यात सहभागी झाले होते, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुलायम सिंह यांनी दिला.  

 

Web Title: Akhilesh Yadav's involvement with Congress in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.