अखिलेश यांच्या जागी नवा चेहरा?
By admin | Published: September 15, 2016 03:46 AM2016-09-15T03:46:19+5:302016-09-15T03:46:19+5:30
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षात सरकार आणि संघटनात्मक पातळीवर रस्सीखेच पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख मुलायमसिंह यादव आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव
मीना कमल , लखनौ
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षात सरकार आणि संघटनात्मक पातळीवर रस्सीखेच पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख मुलायमसिंह यादव आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यातील संघर्ष विधानसभा भंग करण्याच्या निर्णयापर्यंतही जाऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. राज्यातील राजकारण हे अखिलेश सरकारच्या सत्तापालटाकडे पाऊल टाकताना दिसत आहे.
पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव हे मुख्यमंत्री पदावरून अखिलेश यांना हटवून त्यांच्या जागी नवा चेहरा देऊ शकतात, तर विधानसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्रिपदाची खुर्ची कायम ठेवण्यासाठी अखिलेश यादव विधानसभा भंग करण्याच्या विचारात आहेत. राज्यात सपाच्या अंतर्गत राजकारणात वेगवान घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवून त्यांच्या जागी शिवपाल यादव यांची नियुक्ती झाल्यानंतर, अखिलेश यादव यांनी काही तासांतच शिवपाल यांची सिंचन, पूर नियंत्रण, सहकार आदी खाती काढून घेतली. हे प्रकरण मुलायमसिंह यांनी गांभीर्याने घेतल्याचे सांगितले जात आहे. अखिलेश यांच्याकडून पक्षाला हे आव्हान मानले जात आहे. या पूर्वी आमदार मुख्तार अन्सारी यांच्या पक्षाच्या विलयाच्या वेळीही अखिलेश यादव यांनी बंडखोर वृत्ती दाखविली होती आणिसंघटनेला कमी लेखले होते. त्यानंतर मुलायमसिंह यांच्या निर्देशानंतर विलयाचा हा निर्णय मागे घ्यावा लागला होता.
मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या अलीकडच्या काही निर्णयामुळे मुलायमसिंह यादव यांना यात बंडखोरी दिसू लागली आहे. संपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, सरकार आणि संघटना या संघर्षात मुलायमसिंह यादव अखिलेश यांना मुख्यमंत्री पदावरून हटवू शकतात. हा संघर्ष असाच सुरू राहिला तर नव्या प्रदेशाध्यक्षाच्या रूपात शिवपाल सिंह सपाच्या आमदारांची बैठक बोलावून नव्या नेत्याच्या निवडीचा प्रस्ताव आणू शकतात. असे सांगितले जाते की, मुलायमसिंह यादव यांनी आपल्या या डावपेचाचा एक भाग म्हणून शिवपाल यादव यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. विधायक दलाची बैठक बोलाविण्याचा अधिकार आता मुलायमसिंह यादव आणि शिवपालसिंह यादव यांच्याकडे आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा संघर्ष थांबला नाही, तर अखिलेश विधानसभा भंग करण्याची शिफारस करू शकतात.
..........
कुटुंबाचा नव्हे, सरकारचा वाद
हा सरकारचा वाद आहे, कुटुंबाचा नव्हे. तर घराबाहेरील लोक पक्षात हस्तक्षेप करु लागले तर पक्ष कसा चालेल. कुटुंबात सर्व जण नेताजींचा (मुलायम सिंह) शब्द पाळतात. मी सुद्धा ऐकतो. अर्थात काही निर्णय मी घेतले. पण, त्यांचाही शब्द पाळला.
---------
केवळ तुमचे (मुलायमसिंह) ऐकलेय, म्हणून मला खलनायक म्हणून पाहिले जात आहेत, अशी तक्रार शिवपाल यादव यांनी दिल्लीत मुलायमसिंग यादव यांच्या भेटीदरम्यान केल्याचे कळते. मात्र, पक्षात आणि कुटुंबात सर्वकाही आलबेल आहे. कोणतेही मतभेद नाहीत, अशी प्रतिक्रिया त्यांनी बैठकीनंतर दिली.