निरहुआमुळे अखिलेश यांचा मार्ग सुकर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 05:22 AM2019-05-09T05:22:11+5:302019-05-09T05:22:52+5:30
आजमगढमधील जातीय गणिते लक्षात घेऊन भाजपने भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपर स्टार निरहुआ यांना सपचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या विरोधात रिंगणात आणले असले तरी त्यामुळे अखिलेश यांचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
आझमगढ : आजमगढमधील जातीय गणिते लक्षात घेऊन भाजपने भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपर स्टार निरहुआ यांना सपचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या विरोधात रिंगणात आणले असले तरी त्यामुळे अखिलेश यांचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
दिनेशलाल यादव उर्फ निरहुआ समाजवादी पक्षाच्या म्हणजे यादवांच्या मतांमध्ये फूट पाडतील, असा भाजपचा आडाखा आहे. बिगरयादव ओबोसी, दलित आणि सवर्ण गट भाजपसोबत राहतील, त्यामुळे वेगळे चित्र निर्माण होईल, अशी भाजपला आशा आहे. इथे १९ लाख मतदारांपैकी साडेतीन लाखांपेक्षा अधिक यादव, तीन लाखांपेक्षा अधिक मुस्लिम व तेवढेच दलित आहेत. ती मते अखिलेश यांनाच मिळतील, असे चित्र आहे.
आझमगढ हा समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. प्रधानमंत्री मोदी यांची लोकप्रियता आणि अभिनेता म्हणून आपले वलय याद्वारे आपण अखिलेश यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे, असा निरहुआ यांचा दावा आहे. पक्षाच्या नेत्यांनी आग्रह केल्याने आझमगढ मधून निवडणूक लढवित आहोत, असे अखिलेश यांचे म्हणणे आहे.
अखिलेश म्हणाले की, उत्तर प्रदेशातील सर्व ८० मतदारसंघांमध्ये मी प्रचारासाठी फिरलो. आझमगढचा विचार करता नेताजी, मुलायमसिंग यादव येथे आहेत आणि ते जनतेशी जोडले गेलेले आहे. ते खासदार असताना आणि मी मुख्यमंत्री असताना सर्वांगिण विकासाची खात्री दिली होती. ज्या पूर्वांचल एक्सप्रेस वेविषयी भाजप आज बोलत आहे, ती योजना माझी आहे. या मतदारसंघात मी भरपूर योजना आणल्या. (वृत्तसंस्था)