अकोल्याच्या डॉक्टरसह तिघांचा दिल्लीजवळ अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 01:59 AM2018-03-19T01:59:39+5:302018-03-19T01:59:39+5:30
मथुरा जिल्ह्यातील कैती गावानजिक यमुना एक्स्प्रेस-वेवर रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात अ.भा. आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) तीन डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला व आणखी चार डॉक्टर गंभीर जखमी झाले.
नवी दिल्ली/आग्रा : मथुरा जिल्ह्यातील कैती गावानजिक यमुना एक्स्प्रेस-वेवर रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात अ.भा. आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) तीन डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला व आणखी चार डॉक्टर गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील मूळ रहिवासी असलेले डॉ. हर्षद वानखडे (३४) यांचाही समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. वानखडे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे सर्व डॉक्टर दिल्ली येथून आग्रा येथे टाटा इनोव्हाने चालले होते. वानखडे स्वत: गाडी चालवत होते व बाकीचे झोपले होते.
या अपघातात मरण पावलेल्या अन्य दोघांची नावे डॉ. यशप्रीत सिंग (२५), डॉ. हेमबाला (२४) अशी आहेत. याखेरीज डॉ. कॅथरिन हलम, डॉ. महेशकुमार, डॉ. जितेंदर मौर्य व डॉॅ. अभिनव सिंग हे चार जण जखमी झाले आहेत. त्यापैकी डॉ. कॅथरिनला डोक्याला दुखापत झाली आहे.
>मथुरा येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना ‘एम्स’मध्ये हलविण्यात आले. डॉ. वानखडे यांनी कंटेनर ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला व त्यावेळी हा अपघात झाला. कंटेनरबरोबर इनोव्हा ३०० मीटर अंतरापर्यंत फरफटत गेली. इनोव्हा चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. कन्टेनरचा ड्रायव्हर व क्लीनर पळून गेले. मृतांच्या नातेवाईकांना कळविण्यात आले असून ते आल्यावर उत्तरीय तपासणी करून मृतदेह ताब्यात दिले जातील, असेही पोलिसांनी सांगितले.