शास्त्र असतं ते... देधडक कायदे करणाऱ्या अमित शाहांना अक्षय कुमारचा मोलाचा सल्ला!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 09:33 AM2019-12-18T09:33:01+5:302019-12-18T09:54:07+5:30
'अमित शाह देशातील एक महत्वाचे व्यक्ती आहेत. '
नवी दिल्ली : अभिनेता अक्षय कुमार आज बॉलिवूडच्या टॉप स्टार्सपैकी एक आहे. अक्षय कुमारला व्हायरल होण्यासाठी कोणत्याही कारणाची गरज नसते. त्याच्या सिनेमांसारखेच त्याच्या वक्तव्यावरून सुद्धा बातम्या तयार होतात. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मँगो' मुलाखत घेतली होती. ती मुलाखत चांगलीच चर्चेत आली होती. त्याच विषयाला अनुसरून अक्षय कुमाराने एका मुलाखतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे.
दिल्लीत 'आजतक' या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात अँकरने अक्षय कुमारला गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल काही प्रश्न विचारले. यावेळी अँकरने अक्षय कुमारला विचारले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एखादा प्रश्न विचारायचा असेल किंवा एखादा सल्ला द्यायचा असेल, तर काय देशील? यावर अक्षय कुमारने अमित शाह यांनी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर जेवण करून नये, असा सल्ला दिला. तसेच, कोणीही सूर्यास्तानंतर जेवण करून नये. आपल्या शास्त्रांमध्ये सुद्धा सूर्यास्तानंतर जेवण करू नये, असे लिहिले आहे, असे सांगितले.
मुलाखतीत अक्षय कुमार म्हणाला, "मी अमित शाह यांना फक्त त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची विनंती करतो. ते देशातील एक महत्वाचे व्यक्ती आहेत. त्यांनी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर काहीही खाऊ नये, असे मी त्यांना सांगू इच्छितो." याचबरोबर, जर 6.30 वाजल्यानंतर अमित शाह यांनी खाणे बंद केल्यास त्यांच्यासाठी ते फायदेशीर ठरेल. तसेच, सर्वांनीच असे करणे फायदेशीर आहे. आपल्या शास्त्रांमध्ये लिहिले आहे की, सूर्यास्तानंतर कोणीही जेवण करू नये, असेही यावेळी अक्षय कुमारने सांगितले.
दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मँगो' मुलाखत घेतली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला होता. त्यावेळी, तुम्ही आंबे खाता का? असा सवाल अक्षय कुमारने नरेंद्र मोदींना केला होता.