अक्षय, सायनावर नक्षलींचा राग
By admin | Published: May 30, 2017 01:18 AM2017-05-30T01:18:47+5:302017-05-30T01:18:47+5:30
छत्तीसगढच्या सुकमा जिल्ह्यात मार्च महिन्यात नक्षलींच्या हल्ल्यात शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) २५ जवानांच्या
रायपूर : छत्तीसगढच्या सुकमा जिल्ह्यात मार्च महिन्यात नक्षलींच्या हल्ल्यात शहीद झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) २५ जवानांच्या कुटुंबांना आर्थिक मदत केल्याबद्दल नक्षलींच्या बंदी घातलेल्या माओवादी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार व आॅलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्यावर राग व्यक्त केला असून, या दोन्ही सेलिब्रिटींवर आगपाखड करणारी पत्रके दक्षिण बस्तरच्या गावांमध्ये वाटली
आहेत.
या पत्रकात म्हटले आहे की, सीआरपीएफचे जवान देशासाठी शहीद झालेले नाहीत. आदिवासी व अन्य पीडितांचे शोषण करणारे बडे उद्योग व त्यांचे राजकीय आश्रयदाते यांचे हितसंबंध जपण्याचे निंद्य कृत्य हे जवान करीत होते, म्हणून ‘पीपल लिबरेशन आर्मी’ने त्यांचा बदला घेतला आहे.
अशा परिस्थितीत शोषितांच्या बाजूने उभे राहण्याऐवजी शोषण करणाऱ्यांना मदत करून मोठेपणा मिळविण्याच्या अभिनेते, खेळाडू व अन्य सेलिब्रिटींच्या मानसिकतेवर या पत्रकांमध्ये टीका करण्यात आली आहे. अक्षयकुमारने केंद्रीय गृहमंत्रालयाकडून रीतसर परवानगी घेऊन सुकमा हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या १२ जवानांच्या कुटुंबांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी ९ लाख रुपये जमा केले होते, तसेच लष्कर किंवा निमलष्करी दलांतील शहिदांच्या कुटुंबांना नागरिकांना मदत करता यावी यासाठी नंतर अक्षयकुमारने ‘भारतके वीर.कॉम’ या सरकारी पोर्टलचेही उद््घाटन केले होते. (वृत्तसंस्था)
सेलिब्रिटींचा पुढाकार
अक्षयकुमारचे अनुकरण करीत सायना नेहवालनेही सुकमा हल्ल्यातील १२ जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत दिली होती. शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी क्रिकेटपटू गौतम गंभीर यानेही असाच पुढाकार घेतला आहे.
इतरही अनेक सेलिब्रिटी शहीद कुटुंबांना अन्य प्रकारे मदत
करण्यासाठी पुढे आले आहेत.