अल जजीराला दणका, सौदीतील ऑफिस बंद
By admin | Published: June 6, 2017 08:07 AM2017-06-06T08:07:39+5:302017-06-06T09:06:31+5:30
सोमवारी सौदी अरेबियातील सरकारने अल जहीरा या वृत्तवाहिनीला दिलेला परवाना रद्द केला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
रियाध, दि. 6- सोमवारी सौदी अरेबियातील सरकारने अल जजीरा या वृत्तवाहिनीला दिलेला परवाना रद्द केला आहे. तसंच वृत्तवाहिनीचं सौदीतील ऑफिससुद्धा बंद करण्यात आलं आहे. कतारशी राजनैतिक संबंध तोडल्यानंतर सौदी अरेबियाकडून अल जजीरा वाहिनीला दणका दिल्याचं बोललं जातं आहे.
बहारीन, इजिप्त, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात या चार अरब देशांनी कतारशी असलेले राजनैतिक संबंध सोमवारी तोडले. या चार देशांनी हवाई आणि सागरी संबंध तोडले असल्याचं स्पष्ट केलं आहे.
कतारशी संबंध तोडल्यानंतर कतारच्या मालकीच्या ‘अल जजीरा’ या वृत्तवाहिनीला याचा पहिला फटका बसला आहे. या वाहिनीचा सौदी अरेबियातील परवाना रद्द करण्यात आला आहे. ‘अल जजीरा’ वाहिनीने दहशतवादाला प्रोत्साहन दिलं असून सौदीतील अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण केल्याचं सौदी अरेबियातील सरकारने म्हटलं आहे. तर ‘अल जजीरा’ने हे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘अल जजीरा’ ही स्वायत्त संस्था असून प्रदेशातील प्रत्येक देशाला व्यासपीठ निर्माण करुन देण्याचे काम आम्ही करत आहे, असं स्पष्टीकरण अल जजीराने दिलं आहे.
कतारने आधी दहशतवादी गटांना निधीपुरवठा नाकारला होता. कतारचे अमीर तमीम बिन हमद अल थानी यांनी इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांची भेट घेऊन त्यांचं अध्यक्षपदी फेरनिवडीबाबत अभिनंदन केलं होतं. इराणबरोबर कतारने जाऊ नये अशी सौदी अरेबियाची इच्छा होती. कतारने मुस्लीम ब्रदरहूडचे अध्यक्ष महमद मोरसी यांच्याशी संबंध ठेवले होते ते सौदी अरेबियाला आवडलं नव्हतं.