होय...! नवाज शरीफ लादेनकडून पैसे घ्यायचे, पाकिस्तानच्या माजी राजदूताचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 08:33 PM2021-01-31T20:33:25+5:302021-01-31T20:35:37+5:30
भुट्टोंचं सरकार पाडण्यासाठी नवाज शरीफ यांनी १० दशलक्ष डॉलर्सचा फंड घेतल्याचा राजदुताचा दावा
अमेरिकेतील पाकिस्तानच्या राजदूत अबिदा हुसैन यांनी एक मोठा गोप्यस्फोट केला आहो. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे अलकायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याची मदत करत होते आणि त्याच्याकडून आर्थिक मदतही घेत होता असा दावा हुसैन यांनी केला आहे. "ओसामा बिन लादेननंनवाज शरीफ यांची मदत केली होती. ही एक गुंतागुंतीची गोष्ट आहे. ओसामा बिन लादेन हा नवाज शरीफांना आर्थिक मदतदेखील करत होता," असं एक्स्प्रेस ट्रिब्यूननं अबिदा हुसैन यांच्या हवाल्यानं म्हटलं आहे.
"एक अशी वेळ होती जेव्हा लादेन हा अतिशय लोकप्रिय होता आणि अमेरिकेसहित अनेक जण त्याला पसंत करत होते. परंतु नंतर परिस्थिती बदलली," असं अबिदा हुसैन म्हणाल्या. तहरिक-ए-इन्साफचे सगस्य फारूख हबीब यांच्या आरोपानंतर हुसैन यांचं हे वक्तव्य आलं आहे. शरीफ यांनी देशात विदेशी फंडींगचा पाया रचला आणि बेनझीर भुट्टो यांचं सरकार पाडण्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी ओसामा बिन लादेनकडून त्यांनी १० दशलक्ष डॉलर्सचा फंड घेतला, असा आरोप हबीब यांनी केला होता.
तीन वेळा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या नवाज शरीफ यांच्यावर काश्मीरमध्ये जिहादला प्रोत्साहन देण्यासाठी ओसामा बिन लादेनकडून आर्थिक मदत घेत असल्याचे अनेकदा आरोप करण्यात आले होते. १९९०-९३, १९९७-९८ आणि २०१३-१७ या कावधीत नवाज शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान होते. त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं त्यांना पदावरून हटवलं होतं. सध्या ते जामिनावर बाहेर असून लंडनमध्ये ते उपचार घेत आहेत. डॉनच्या वृत्तानुसार ओसामानं शरीफ यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली. परंतु सत्तेत आल्यानंतर आपल्या सर्व आश्वासनांवरून शरीफ मागे फिरले असल्याचंही सांगण्यात आलं.