चिंताजनक! बेरोजगारांना हार्ट अटॅकचा धोका; दशकात १५ टक्के लोक होणार ग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 10:21 AM2024-08-28T10:21:39+5:302024-08-28T10:21:54+5:30

संशोधकांनी तरुणांमधील हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा (सीव्हीडी) नेमका धोका यात निश्चित केला आहे. 

Alarming Unemployed youth at risk of heart attack In a decade 15 percent of people will suffer | चिंताजनक! बेरोजगारांना हार्ट अटॅकचा धोका; दशकात १५ टक्के लोक होणार ग्रस्त

चिंताजनक! बेरोजगारांना हार्ट अटॅकचा धोका; दशकात १५ टक्के लोक होणार ग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नोकरी करणाऱ्यांच्या तुलनेत बेरोजगारांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असतो. बेरोजगार पुढील १० वर्षांत हृदयाशी संबंधित आजारांना बळी पडू शकतात. यात स्त्रियांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा धोका जास्त असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि दिल्ली एम्सच्या संयुक्त वैद्यकीय अभ्यासातून समोर आले आहे. 

हे संशोधन इंडियन जर्नल ऑफ  मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. संशोधकांनी तरुणांमधील हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा (सीव्हीडी) नेमका धोका यात निश्चित केला आहे. 

४.५% बेरोजगारांमध्ये धोका गंभीर
अभ्यासात या आजारांचे पुढील १० वर्षांत अतिशय कमी, मध्यम आणि उच्च जोखमीचे प्रमाण अनुक्रमे ८४.९, १४.४, ०.७ टक्के असल्याचे आढळून आले. यामध्ये ३४८ बेरोजगारांचा समावेश होता. त्यातील ४.५ टक्के लोकांना पुढील १० वर्षांत हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असल्याचे आढळून आले, तर सुमारे १२ टक्के काम करणाऱ्या लोकांना मध्यम धोका असल्याचे आढळून आले.

नेमका कुणा-कुणाला आहे हा धोका?
बेंगळूरू स्थित आयसीएमआरचे डॉ. प्रशांत माथूर यांनी सांगितले की, उच्च जोखीम असलेल्या लोकांची लवकर ओळख होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अभ्यासात ४,४८० लोकांना सहभागी करून घेण्यात आले. त्यात ५०% ४० ते ४९ वयोगटातील आहेत. ज्या लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित राहते, त्यातील जवळपास २५% लोकांना हृदय, रक्तवाहिन्यांचा आजार होण्याचा धोका असतो. १८% लठ्ठ लोकांनाही हा धोका असतो.

शहरी लोकांवर संकट?
अभ्यासात, संशोधकांनी शहरी विरुद्ध ग्रामीण लोकसंख्येच्या आधारावर पुढील १० वर्षांमध्ये हृदयविकाराच्या जोखमीचे ही मूल्यांकन केले आहे.

यानुसार, गंभीर धोका शहरी लोकसंख्येमध्ये सर्वाधिक आहे. सुमारे १७.५ टक्के शहरी लोकसंख्येला हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचा मध्यम ते गंभीर धोका असल्याचे आढळून आले, तर ग्रामीण लोकसंख्येच्या १३.८ टक्के लोकांना या आजारांचा धोका आहे. 

खेड्यातील ८६.२ टक्के लोक हृदयाशी संबंधित आजारांच्या जोखमीपासून मुक्त आहेत.

Web Title: Alarming Unemployed youth at risk of heart attack In a decade 15 percent of people will suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.