नवरदेवाला 'झिंगाट' झालेला पाहून नवरीने दोन तासातच दिला तलाक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 02:37 PM2019-04-26T14:37:46+5:302019-04-26T14:44:19+5:30
निकाहानंतर नशेत झिंगाट झालेल्या नवरदेवाला नवरीने फक्त दोन तासांतच तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. तसेच नवरदेवाने केलेल्या या कारनाम्यामुळे वधू पक्षाने त्याला चांगलाच चोप दिला.
रांची - विवाहसोहळा म्हटलं की त्यामध्ये सेलिब्रेशन, पार्टी या गोष्टी ही येत असतात. मात्र नशा करणं एका नवरदेवाला चांगलंच महागात पडलं आहे. निकाहानंतर नशेत झिंगाट झालेल्या नवरदेवाला नवरीने फक्त दोन तासांतच तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. तसेच नवरदेवाने केलेल्या या कारनाम्यामुळे वधू पक्षाने त्याला चांगलाच चोप दिला. इतकेच नाही तर जमलेल्या सर्व मंडळींसमोर उठा-बशा काढण्याची शिक्षा ही दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, रांची येथील मौलाना आझाद कॉलनीमध्ये बुधवारी एका निकाहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सिमडेगा येथील वासीम अक्रमची वरात आली होती. कांटाटोली येथील एका बँक्वेट हॉलमध्ये निकाह होत होता. निकाहानंतर एक विधीसाठी नवरीचा भाऊ हा नवरदेवाला बोलवण्यासाठी गेला. तेव्हा नवरदेव त्याचा काही मित्रांसह गांजा पिताना दिसला. यावरून नवरीच्या भावाने वासीमला जाब विचारला. तर त्याने उलट उत्तर देण्यास सुरुवात केली. निकाहसाठी उपस्थित असलेल्या सर्व मंडळींना नशेत झिंगाट झालेल्या नवरदेवाची माहिती मिळाली. यानंतर नाराज झालेल्या वधू पक्षाने मुलीला तलाक देण्यास सांगितले.
तलाक दिल्यानंतर वर आणि वधू या दोन्ही पक्षात वाद सुरू झाला. वादाचे रुपांतर थोड्याच वेळात हाणामारीत झाले. त्यावेळी वधू पक्षाने नशेत तर्र झालेल्या नवरदेवाची चांगलीच धुलाई करण्यात आली. तसेच वधू पक्षाने नवरदेवाला आपल्या घरी आणले. गुरुवारी आजुबाजूच्या लोकांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून हुंडा म्हणून घेतलेले पैसै परत देण्यास सांगितले. घेतलेले सर्व पैसे परत दिले तरच घरी सोडलं जाईल ही अट नवरदेव आणि त्याच्या कुटुंबियांसमोर ठेवली. याशिवाय सर्व गावकऱ्यासमोर नवरदेवाला कान पकडून उठा-बशा काढण्याची शिक्षा दिली. हुंडा म्हणून घेतलेले सर्व पैसे परत देण्याची मुलीच्या कुटुंबियांनी मागणी केली होती. त्यानुसार नवरदेवाने 1.5 लाख लगेचच परत केले. मात्र शिल्लक राहिलेले 1 लाख तो परत करू शकला नाही. त्यावेळी वधू पक्षाने त्याची कार आपल्याकडे जप्त करून ठेवली आणि सर्व पैसे परत केल्यानंतरच ही कार त्यांना दिली जाईल असे सांगितले आहे.