मद्यपी कर्मचाऱ्यांची रेल्वे उतरवणार !
By admin | Published: June 11, 2014 10:58 PM2014-06-11T22:58:18+5:302014-06-11T22:58:18+5:30
प्रत्येक रेल्वे चालक आणि सहायक चालक दररोज ड्यूटीवर रुजू होण्यापूर्वी त्यांनी मद्यसेवन केलेले नाही खात्री करण्यासाठी श्वासोच्छ्वास विश्लेषण चाचणी करण्याचा प्रस्ताव
नवी दिल्ली : प्रत्येक रेल्वे चालक आणि सहायक चालक दररोज ड्यूटीवर रुजू होण्यापूर्वी त्यांनी मद्यसेवन केलेले नाही याची खात्री करण्यासाठी त्यांची सक्तीने ‘ब्रीथ अॅनेलायजर टेस्ट’ (श्वासोच्छ्वास विश्लेषण चाचणी) करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रस्ताव आहे. तसेच रेल्वेमध्ये सुरक्षिततेशी संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी कोणाला दारूचे अथवा अन्य प्रकारे नशा करण्याचे व्यसन आहे,याची माहिती घेऊन त्यांच्या स्वतंत्र याद्या तयार करण्यासही सर्व वरिष्ठ पर्यवेक्षकांना सांगण्यात येणार आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांमधील आणि विशेषत: गाड्या चालविणे, स्थानकांचे व्यवस्थापन करणे व गाड्यांमध्ये विविध प्रकारच्या सेवा पुरविणे या कामांशी संबंधित असलेल्या कर्मचाऱ्यांमधील मद्यसेवनास आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आखलेल्या नव्या धोरणात या उपायांचा समावेश आहे. प्रशासनाने हे प्रारूप धोरण सर्व संबंधितांची मते जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे पाठविले असून या विचारविनिमयानंतर ते लागू केले जाणार आहे.
ड्यूटीवर रुजू होताना संबंधित कर्मचाऱ्याच्या रक्तात अल्कोहोलचे प्रमाण ठराविक मर्यादेहून जास्त असल्याचे चाचणीमध्ये आढळून आले, तर कडक कारवाई करण्याचाही यात समावेश आहे. यानुसार कोणीही चालक ड्यूटीवर येईल तेव्हा त्याच्या रक्तात दर १०० मिलिलिटरमागे २० हून अधिक मिलिग्रॅम अल्कोहोल असल्याचे चाचणीतून निष्पन्न झाले, तर अशा चालकाला तात्काळ सेवेतून काढून टाकण्याचा रेल्वेचा प्रस्ताव आहे.
चाचणीमध्ये याहून कमी प्रमाणात अल्कोहोल प्रथम आढळून येईल तेव्हा त्याची सर्व्हिस रेकॉर्डमध्ये नोंद करून अशा चालकाला गाडी चालवू दिली जाईल; मात्र असे दुसऱ्यांदा झाल्यास अशा चालकाच्या नोकरीवरही गदा येईल.
ज्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी अशी चाचणी करून घेणे सक्तीचे केले जाईल. त्यांनी ती करून घेण्यास नकार दिल्यास त्यांनी मद्यसेवन केले आहे असे मानून त्यांना ड्यूटीवर रुजू होऊ दिले जाणार नाही. तसेच अशा नकाराबद्दल त्यांच्यावर खात्यांतर्गत शिस्तभंगाची कारवाईही केली जाईल, असे या नव्या धोरणात नमूद केले गेले आहे.
प्रत्येक वरिष्ठ सुपरवायझरने आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी कोणाला दारूचे व्यसन आहे याची माहिती विविध मार्गांनी मिळवून त्यांची स्वतंत्र यादी तयार करावी. तसेच प्रशिक्षण काळ सुरू असलेला कर्मचारी व्यसनी आहे, असे आढळून आल्यास त्यास नोकरीत कायम केले जाऊ नये, असेही या धोरणात म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)