अलर्ट ! 'गॅलॅक्सी नोट 7' वापरत असाल तर सावधान
By admin | Published: October 11, 2016 10:02 AM2016-10-11T10:02:42+5:302016-10-11T10:13:37+5:30
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेडने 'सॅमसंग गॅलेक्सी नोट 7' चे प्रोडक्शन थांबवले आहे. तसेच ग्राहकांना हा स्मार्टफोन न वापरण्याची सूचना दिली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेडने 'सॅमसंग गॅलॅक्सी नोट 7' चे प्रोडक्शन थांबवले आहे. तसेच ग्राहकांना हा स्मार्टफोन न वापरण्याची सूचना दिली आहे. अमेरिकेमध्ये विमान प्रवासादरम्यान एका ग्राहकाच्या सॅमसंग नोट 7 फोनला अचानक आग लागल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कंपनीने 'सॅमसंग गॅलॅक्सी नोट 7' धारकांना तात्काळ फोन स्विच्ड ऑफ करायला सांगितले असून फोन न वापरण्याची सूचना दिली आहे. फोनला अचानक आग लागणे, फोनचा स्फोट होणे, आणि बॅटरी तापणे या कारणांमुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
सॅमसंग नोट 7मधील बॅटरीच्या समस्येमुळे कंपनीने 2.5 मिलियन हँडसेट परत मागवून घेतले आहेत, फोनची निर्यातदेखील रोखली आहे, तसेच विक्रेत्यांनी फोनची विक्रीही थांबवायला सांगितले आहे. स्मार्टफोनमधील बॅटरीसंबंधी समस्येमुळे कंपनीला दोन महिन्यात दुस-यांदा फोनची विक्री थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.
याआधी फोन अधिक प्रमाणात तापत असल्याची तक्रार दक्षिण कोरियातून नोंदवण्यात आली होती. दक्षिण कोरियातून नोंदवण्यात आलेल्या तक्रारीनंतर कंपनीने तातडीने ग्राहकांना जुना नोट 7 घ्यावा किंवा फोन बदलून घ्यायला सांगितले होते, मात्र तरीही फोनमधील समस्या कायम होत्या. अखेर, कंपनीने याचे प्रोडक्शन थांबवले. दरम्यान, भारतामध्ये हा फोन अजूनही मार्केटमध्ये आलेला नाही.
अॅपलच्या नव्या आयफोनसोबत स्पर्धा करण्यासाठी ऑगस्ट महिन्यामध्ये हा फोन मार्केटमध्ये लाँच करण्यात आला होता, मात्र या घटनांमुळे, स्मार्टफोनमध्ये जागतिक पातळीवर टॉपवर असलेल्या या ब्रँडला मोठा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर, फोनमध्ये नेमक्या काय समस्या निर्माण झाल्या आहेत, फोनच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम शोधून काढला पाहिजे, नाहीतर याचा फटका मार्केटमध्ये येणा-या गॅलेक्सी 8 वर देखील बसू शकतो, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.