आंतरराष्ट्रीय विमानतळांवर अॅलर्ट
By Admin | Published: October 23, 2015 02:51 AM2015-10-23T02:51:42+5:302015-10-23T02:51:42+5:30
आगामी दिवाळी आणि लग्नाचा मोसम पाहता सोन्याची तस्करी वाढण्याची शक्यता ध्यानात घेऊन देशभरातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सावधानतेचा इशारा देण्यात आला
नवी दिल्ली : आगामी दिवाळी आणि लग्नाचा मोसम पाहता सोन्याची तस्करी वाढण्याची शक्यता ध्यानात घेऊन देशभरातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
सोन्याची तस्करी रोखण्यासाठी सर्व व्यावसायिक पार्सलची कसून तपासणी करणे आणि संशयास्पद हालचाल वाटल्यास संबंधित व्यक्तीची कसून झडती घेण्यास कस्टम्स अधिकाऱ्यांना सांगण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.
नोव्हेंबर-फेब्रुवारी या काळात दिवाळी, लग्नाचा मोसम येत आहे. या काळात सोन्याची तस्करी वाढण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही शक्यता ध्यानात घेऊन अधिकाऱ्यांनी विमानतळांवर कठोर नजर ठेवली आहे. त्यात आणखी उपाययोजना आखणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
एका ज्येष्ठ कस्टम्स अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी रोखण्यासाठी अधिकारी सज्ज आहेत. ही निगराणी आणखी कडक केली जाणार आहे. विशेषत: पश्चिम आशिया आणि दक्षिण आशियाई देशांतून येणाऱ्या विमानातील प्रवाशांची कसून झडती घेण्यात येत आहे.
दिवाळीत सोन्याची विक्री प्रचंड होते. त्यातही धनत्रयोदशीच्या दिवशी ग्राहक सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. भारतात अमृतसर, जयपूर, दिल्ली, अहमदाबाद,
मुंबई, कोलकता, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, थिरुवअनंतपुरम, गोवा, पोर्टब्लेअर आदी १९ आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. गेल्या काही दिवसांत देशात आणि दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी वाढली आहे.
११२० कोटी रुपयांचे ४,४८० किलो सोने जप्त
२०१४-१५ या वर्षात ३८८ प्रकरणांत २३० लोकांना अटक करण्यात आली. ज्यांच्यापासून १५५ कोटी रुपयांचे ५९६ किलो सोने जप्त करण्यात आले. २०१३-१४ मध्ये सोन्याच्या तस्करीची ३६३ प्रकरणे उघडकीस आली. त्यात ९२ कोटी रुपयांचे ३५३ किलो सोने जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात १२३ जणांना अटक करण्यात आली होती.
यंदा एप्रिल ते आॅगस्ट या काळात १६९ प्रकरणी १०० जणांना अटक करून ७६ कोटी रुपयांचे २९३ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. २०१४-१५ मध्ये देशभरात सोन्याच्या तस्करीची ४४०० प्रकरणे उघडकीस आली. त्यात ११२० कोटी रुपयांचे ४,४८० किलो सोने जप्त करण्यात आले. यासाठी २५२ जणांना अटक करण्यात आली.