Ayodhya Case : अलर्ट! अयोध्या निकालाच्या शक्यतेने देशभर कडक सुरक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 05:16 PM2019-11-08T17:16:28+5:302019-11-08T17:19:29+5:30

Ayodhya Case : पोलिसांना सतर्कतेच्या सूचना; रजा केल्या रद्द, महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेशवर अधिक लक्ष

Alert! Strong security across the country with the possibility of Ayodhya verdict | Ayodhya Case : अलर्ट! अयोध्या निकालाच्या शक्यतेने देशभर कडक सुरक्षा 

Ayodhya Case : अलर्ट! अयोध्या निकालाच्या शक्यतेने देशभर कडक सुरक्षा 

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्रातही पोलीस, धडक कृती दले, रेल्वे पोलीस, गृहरक्षक दल तसेच राज्य राखीव दल यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही नीट चालत आहेत का, हे पाहून प्रसंगी ते ताबडतोबीने दुरुस्त करून घेण्यास सांगण्यात आले आहे.

मुंबई/नवी दिल्ली  - अयोध्येतील जमीन मालकीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कधीही येण्याची शक्यता असून, त्यानंतर कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी केंद्र सरकारने राज्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. उत्तर प्रदेश, दिल्ली व मुंबईत अतिदक्षता बाळगण्यात येत आहे. महाराष्ट्रातही पोलीस, धडक कृती दले, रेल्वे पोलीस, गृहरक्षक दल तसेच राज्य राखीव दल यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.

रजेवरील पोलीस व सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना तत्काळ कामावर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे आणि रेल्वे स्थानकांवर २४ तास पुरेसा उजेड ठेवा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही नीट चालत आहेत का, हे पाहून प्रसंगी ते ताबडतोबीने दुरुस्त करून घेण्यास सांगण्यात आले आहे.

अतिगर्दीची ठिकाणे तसेच सर्व धार्मिक स्थळे येथेही बंदोबस्त लावण्यात येत आहे. कोणत्याही ठिकाणी गर्दी जमू नये, याची काळजी घेण्यास पोलिसांना सांगितले आहे. हा निकाल कधी येणार, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र सरन्यायाधीश रंजन गोगोई १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार असल्याने त्याआधी हा निकाल लागेल, हे स्पष्ट आहे.
रेल्वे प्रवाशांचे सामान तपासण्यात हयगय करू नका, असे बजावण्यात आले आहे. स्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्यांवरही लक्ष ठेवले जात आहे. विमानतळांवरील प्रवासी व त्यांचे सामान यांची बारकाईने तपासणी सुरू आहे. हॉटेल व रेस्टॉरंट यांनाही सीसीटीव्ही सुरू ठेवा आणि प्रसंगी येणाऱ्यांचे सामान तपासा, अशा सूचना दिल्या आहेत. टॅक्सी ड्रायव्हर्सनाही संशयास्पद प्रवासी वा सामान दिसल्यास पोलिसांना कळवण्याच्या सूचना आहेत.

पोलीस महासंचालकांनी घेतली राज्यपालांची भेट

या निकालाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय बर्वे यांनी गुरुवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली आणि त्यांना सुरक्षेच्या उपाययोजनाची माहिती दिली. राज्यात सध्या राजकीय अस्थैर्य असल्याने अधिक काळजी घेण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्याचे समजते.

Web Title: Alert! Strong security across the country with the possibility of Ayodhya verdict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.