तीन विद्यार्थ्यांनी चक्क 'हिजबुल'च्या दहशतवाद्यासाठी घेतली शोकसभा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 12:19 PM2018-10-12T12:19:40+5:302018-10-12T12:30:26+5:30
मृत्यूनंतर शोकसभा घेण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपावरून अलिगढ मुस्लिम विद्यापीठाने (AMU) तीन विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे.
अलिगढ - हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर मन्नान वाणीचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. मात्र त्याच्या मृत्यूनंतर शोकसभा घेण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपावरून अलिगढ मुस्लिम विद्यापीठाने (AMU) तीन विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे. मन्नान वाणीने अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून पीएचडीपर्यंत शिक्षण घेतले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्याने हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सहभाग घेतला होता.
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात गुरुवारी ( 11 ऑक्टोबर ) जवान आणि दहतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. त्यामध्ये मन्नानचा समावेश होता. मन्नानच्या मृत्यूनंतर अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील केनेडी सभागृहात 15 विद्यार्थी एकत्र जमले. त्यांनी वाणीसाठी नमाज अदा करण्यास सुरुवात केली. विद्यापीठाच्या नियमांचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे ही सभा घेतली.
याप्रकरणी विद्यापीठातील तीन विद्यार्थ्यांचे निलंबन करण्यात आले आहे तर अन्य चार विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक रेकॉर्ड तपासला जाणार आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेनेही या विद्यार्थ्यांना नमाज अदा करण्यापासून रोखले होते. विद्यार्थी परिषदेचे माजी अध्यक्ष फैजुल हसन यांनी सभेच्या ठिकाणी पोहोचून दहशतवाद्यासाठी नमाज अदा करणे योग्य नव्हे, असे सांगत या विद्यार्थ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
मन्नान वाणीने अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून पीएचडीपर्यंत शिक्षण घेतले होते. मन्नानचे हातात रॉकेट लाँचर घेतलेले छायाचित्र आणि त्याने लिहीलेले खुले पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आम्हाला भारतीय असोत किंवा काश्मिरी नागरिक असोत कोणालाही ठार करण्यात काहीही स्वारस्य नाही, जे आम्हाला दहशतवादी म्हणतात त्यांनी एक तर त्यांची पाठ्यपुस्तके बदलावीत किंवा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावा म्हणजे लढणे हे आमचे काम नसून ती आमची गरज आहे हे आमच्या विरोधात बोलणाऱ्यांच्या लक्षात येईल असेही मन्नान वाणीने त्याच्या पत्रात म्हटले होते. मात्र गुरुवारी झालेल्या चकमकीत त्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे.