अलका लांबा यांच्यामते, 'या' कारणांमुळेच दिल्लीत 'आप'चा दारुण पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 11:36 AM2019-05-30T11:36:49+5:302019-05-30T11:37:08+5:30
लोकसभेतील आपच्या पराभवाचे कारण आम आदमी पक्षाच्या आमदार अलका लांबा यांनी सांगितले. एक वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत लांबा म्हणाल्या की, ज्या लोकांचा जनतेशी संपर्क नव्हता, अशा लोकांना आम आदमी पक्षाचे तिकीट देण्यात आले.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्वच्या सर्व सात जागांवर भारतीय जनता पक्षाने शानदार विजय मिळवला. दिल्ली विधानसभेत सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाला खातं देखील उघडता आलं नाही. तर काँग्रेसची स्थिती देखील अशीच आहे. विधानसभा निवडणुकीत दिल्लीकरांनी 'आप'ला शानदार विजय मिळवून दिला होता. तर भाजपला केवळ ३ जागा जिंकता आल्या होत्या.
लोकसभेतील आपच्या पराभवाचे कारण आम आदमी पक्षाच्या आमदार अलका लांबा यांनी सांगितले. एक वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत लांबा म्हणाल्या की, ज्या लोकांचा जनतेशी संपर्क नव्हता, अशा लोकांना आम आदमी पक्षाचे तिकीट देण्यात आले. उमेदवारांची ओळख केवळ मीडियामध्ये होती. जनतेत जावून त्यांनी कधीही काम केलेले नव्हते. त्यामुळे प्रचार करताना सर्वाधिक वेळ उमेदवाराची ओळख करून देण्यात गेला, अस सांगताना लांबा यांनी आपच्या पराभवासाठी हीच बाब जबाबदार असल्याचे म्हटले.
दरम्यान दिल्लीतील आपच्या उमेदवारांची निवड बंद खोल्यांमध्ये करण्यात आली. यामध्ये लोकशाहीचे पालन करण्यात आले नाही. विद्यमान आमदारांना देखील तिकीट दिले असते, तर हे आमदार लोकसभेला निवडून आले असते, असंही लांबा यांनी सांगितले. तसेच 'आप'चा जनाधार कमी झाला असून तो परl आणणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले.
अलका लांबा सध्या आम आदमी पक्षापासून राजकीय दृष्ट्या वेगळ्या झाल्या आहेत. मात्र आमदारकीचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत त्या पक्षाशी निगडीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.