हवाई दलाच्या दुर्घटनाग्रस्त विमान एएन-32मधल्या सर्व 13 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 01:27 PM2019-06-13T13:27:35+5:302019-06-13T13:27:42+5:30
अरुणाचल प्रदेशमधल्या सियांग जिल्ह्यात हवाई दलाचं दुर्घटनाग्रस्त विमान एएन-32मधल्या सर्व 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
ईटानगर- अरुणाचल प्रदेशमधल्या सियांग जिल्ह्यात हवाई दलाचं दुर्घटनाग्रस्त विमान एएन-32मधल्या सर्व 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, विमानाच्या अवशेषांपर्यंत बचाव पथक पोहोचल्यानंतर हवाई दलानं सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची खातरजमा केली आहे. या अपघातात सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची सूचना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंतही पोहोचवण्यात आली आहे. हवाई दलानं ट्विट करत याची माहिती दिली आहे.
तत्पूर्वी 15 सदस्याचं बचाव पथक आज सकाळी दुर्घटनाग्रस्त विमानाच्या अवशेषापर्यंत पोहोचलं. अवशेषाची तपासणी केली असता विमानातील कोणताही सदस्य जिवंत राहिला नसल्याचं हवाई दलानं स्पष्ट केलं आहे. या बचाव पथकामध्ये एअरफोर्स, लष्कराचे जवान आणि गिर्यारोहकांचा समावेश होता.
IAF: Following air-warriors lost their lives in #AN32 aircraft crash - Wing Commander GM Charles, Squadron leader H Vinod, Flight lieutenant R Thapa, Flight lieutenant A Tanwar, Flight lieutenant S Mohanty & Flight lieutenant MK Garg, (1/2) pic.twitter.com/OIKm4uTDM7
— ANI (@ANI) June 13, 2019
बचाव पथकाला एअरलिफ्ट करून विमानाच्या अवशेषांपर्यंत नेण्यात आलं, त्यानंतर त्यांना हेलिड्रॉप केलं. मंगळवारी भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता विमान AN-32 अवशेष अरुणाचलमधील सियांग जिल्ह्यात दिसले होते. दुर्घटनाग्रस्त विमान फारच उंचावर आणि घनदाट जंगलामध्ये आहे. अशा ठिकाणी पोहोचणं हे आव्हानात्मक होतं.
IAF: Following air-warriors lost their lives in #AN32 aircraft crash: Warrant Officer KK Mishra, Sergeant Anoop Kumar, Corporal Sherin, Lead Aircraft Man SK Singh, Lead Aircraft Man Pankaj, Non-combatant Employee Putali & Non-combatant Employee Rajesh Kumar. (2/2) https://t.co/FDDgLZ1lJW
— ANI (@ANI) June 13, 2019
भारतीय हवाई दलाच्या ३ जून रोजी कोसळलेल्या मालवाहू विमानाच्या अवशेषाचा काही भाग अरुणाचल प्रदेशच्या सियांग जिल्ह्यातील पायुमजवळील दुर्गम भागात आढळले होते. हे विमान आसामच्या जोरहाटहून अरुणाचल प्रदेशच्या मेचुका या लष्करी तळाकडे निघाले होते.
या विमानात 8 कर्मचारी व 5 प्रवासी, असे 13 जण होते. एका आठवड्यानंतर विमानाचे अवशेष सापडल्याने त्यातील कर्मचारी जिवंत असण्याची शक्यता धूसर आहे. हे विमान कशामुळे कोसळले, याचाही आता तपास करण्यात येईल. हे विमान ३ जून रोजी दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी जोरहाटहून निघाले होते; पण दुपारी एक वाजण्याच्या सुमारात त्याचा संपर्क तुटला.
या विमानाचे अवशेष पायुमजवळील दुर्गम भागात आढळल्याचे हवाई दलाने ट्विटद्वारे कळविले आहे. हे रशियन बनावटीचे अँटोनोव एएन-32 जातीचे विमान होते, यापूर्वीही अशा विमानांना अपघात झाले आहेत. या विमानाचा संपर्क तुटताच हवाई दलाने सर्वत्र शोध सुरू केला होता. त्यात नौदल, तसेच लष्कराचे जवान व इंडो-तिबेट बॉर्डर फोर्सचे पोलीसही मदत करीत होते.