पहलू खान खून खटल्यात सर्व आरोपी निर्दोष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 05:21 AM2019-08-15T05:21:53+5:302019-08-15T05:22:08+5:30
कत्तलीसाठी गायी घेऊन जात असल्याच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत पहलू खान या हरियाणातील दूध व्यावसायिकाच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूसंदर्भात दाखल केल्या गेलेल्या खून खटल्यातील...
अलवर : कत्तलीसाठी गायी घेऊन जात असल्याच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत पहलू खान या हरियाणातील दूध व्यावसायिकाच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या मृत्यूसंदर्भात दाखल केल्या गेलेल्या खून खटल्यातील सर्व सहा आरोपींची सत्र न्यायालयाने बुधवारी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
पहलू खान व त्याची दोन मुले राजस्थानात खरेदी केलेल्या गायी हरियाणातील त्यांच्या गावी ट्रकमधून नेत असता १ एप्रिल २०१७ रोजी जयपूर-दिल्ली महामार्गावरील बेहरोर गावाजवळ जमावाने ट्रक अडवून पेहलू खानला जबर मारहाण केली होती. दोन दिवसांनी त्याचा इस्पितळात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशाच्या अनेक भागांत स्वयंघोषित गोरक्षकांच्या बेछूट हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘कायदा हातात घेऊ नका’, असे गोरक्षकांना बजावावे लागले होते.
विपीन यादव, रवींद्र यादव, कालू राम यादव, दयानंद यादव, योगेश खाटी आणि भीम राठी या सहाही आरोपींना संशयाचा फायदा देऊन न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. आरोपींचे वकील अॅड. हुकूमचंद शर्मा यांनी या निकालास ‘ऐतिहासिक’ असे संबोधून ‘एफआयआर’मध्ये नामोल्लेख नसूनही या सर्वांना नाहक गोवले, असे सांगितले. पहलू खानचे कुटुंबीय निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करतील, असे त्यांचे वकील अॅड. कासीम खान म्हणाले. (वृत्तसंस्था)
विधेयक मंजुरीनंतर
१0 दिवसांत निकाल
विशेष म्हणजे जमावाच्या झुंडशाहीने कोणाचा मृत्यू झाल्यास आरोपींना किमान जन्मठेप आणि पाच लाख रुपयांच्या दंडाची तरतूद करणारे कायदा दुरुस्ती विधेयक राजस्थान विधानसभेने मंजूर केल्याला १० दिवसही झालेले नसताना हा निकाल लागला आहे. दुसरीकडे याच घटनेच्या संदर्भात पोलिसांनी पहलू खान व त्याच्या दोन मुलांविरुद्ध गायींच्या तस्करीच्या आरोपावरून स्वतंत्र गुन्हा नोंदवून आरोपपत्रही दाखल केले आहे. अलीकडे त्या प्रकरणाच्या फेरतपासासाठी न्यायालयात अर्ज केला गेला.