भाजपा, बसपची सर्व गणिते सपाने उधळली
By admin | Published: January 21, 2017 05:14 AM2017-01-21T05:14:17+5:302017-01-21T05:14:17+5:30
मुलायम सिंह यादव आणि त्यांचे चिरंजीव अखिलेश यादव अर्थात टिपू यांनी निवडणुकीच्या पहिल्या फेरीत तरी जोरदार धक्का दिला
व्यंकटेश केसरी,
नवी दिल्ली- आपले मुख्य विरोधक भारतीय जनता पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांना उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत नेताजी मुलायम सिंह यादव आणि त्यांचे चिरंजीव अखिलेश यादव अर्थात टिपू यांनी निवडणुकीच्या पहिल्या फेरीत तरी जोरदार धक्का दिला आहे. मुलायम यांनी मुलापुढे शरणागती पत्करली, असे चित्र दिसत असले तरी पिता-पुत्रांनी आपापसातील संघर्षाचा फायदा विरोधकांना मिळवून दिला नाही. किंबहुना राज्यातील जनतेची सहानुभूतीच मिळवली.
सत्ताधारी पक्षाच्याविरोधात मतदारांत असलेली कथित नाराजी या दोघांनी सहानुभूतीमध्ये बदलून घेतली आहे. यासाठीची कृती त्यांनी विदेशी कंपनीने लिहिलेल्या पटकथेप्रमाणे केली व त्यात त्यांना यश आले. समाजवादी पक्षात जो जोरदार संघर्ष उफाळून आला होता, त्याचा लाभ घेण्यात भाजपा व बसपा यांना अपयश आले आहे.
मोदी व मायावती यांना यादव कुटुंबातील भांडणाचा लाभ घेता आला नाही. पण अखिलेश यांना मुलायमसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली नेता व समाजवादी पक्षाचा सर्वोच्च नेता बनविले. मुलायमसिंह यादव यांनी या भांडणात कुटुंब अखंड ठेवले व आता तर ते उघडपणे अखिलेशला आशीर्वाद देत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी हे सर्जिकल स्ट्राईक्स आणि काळ््या पैशांच्याविरोधात उपाय म्हणून नोटाबंदीच्या निर्णयाचा वापर करण्याची अपेक्षा असताना समाजवादी पक्षाने प्रचारयुद्ध तर जिंकले आहे.
>काँग्रेसला धक्का
अखिलेश यादव यांनी २00 उमेदवारांची यादी जाहीर केल्यामुळे काँग्रेसला धक्काच बसला आहे. सपाने एकतर्फी यादी जाहीर करणे काँग्रेसला आवडलेले नाही. आघाडीची बोलणी सुरू होण्याआधीच सपाने आपल्या मतदारसंघांवर उमेदवार घोषित केले, अशी काँग्रेसची तक्रार आहे.