सगळ्याच देशांना चंद्रावर जायचंय तरी कशासाठी? चंद्रावरील दुर्मिळ धातूंवर नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 09:19 AM2023-08-14T09:19:09+5:302023-08-14T09:20:43+5:30
चंद्रावर पृथ्वीसारखा कोणता घटक आहे, ज्याला मिळवण्यात लोकांना खूप रस आहे? चंद्रावर नेमके काय आहे? भारत, रशियानंतर अमेरिका, चीनही चंद्रावरील अभ्यासासाठी उत्सुक.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारताच्या चंद्रयान-३ नंतर रशियानेही चंद्रावर लुना-२५ मिशन पाठवले आहे. अमेरिका आणि चीनही चंद्रावरील अभ्यासासाठी उत्सुक आहेत. चंद्रावर पृथ्वीसारखा कोणता घटक आहे, ज्याला मिळवण्यात लोकांना खूप रस आहे? चंद्रावर नेमके काय आहे, चंद्रावर खोदकाम करणे म्हणजे काय आणि चंद्रावरून तेथील दुर्मीळ धातू गोळा करणे किती सोपे का हे जाणून घेऊ...
चंद्रावर खाणकाम कसे चालते?
पहिल्यांदा चंद्रावर थांबून पायाभूत सुविधा तयार कराव्या लागतील, जे सर्वात कठीण काम आहे. चंद्रावर पाणी आढळल्यास मानव तेथे दीर्घकाळ राहू शकेल.
अवकाश करारात काय आहे?
१९६६ च्या यूएन बाह्य अवकाश करारात असे म्हटले आहे की कोणतेही राष्ट्र चंद्रावर वा इतर ग्रहांवर सार्वभौमत्वाचा दावा करू शकत नाही. एखादी खासगी संस्था चंद्राच्या एका भागावर सार्वभौमत्वाचा दावा करू शकते की नाही हे यात स्पष्ट नाही. १९७९ च्या चंद्र करारात असे नमूद केले आहे की चंद्राचा कोणताही भाग कोणत्याही देशाची, आंतरराष्ट्रीय, गैर-सरकारी संस्था, राष्ट्रीय संस्था किंवा गैर-सरकारी संस्था किंवा कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता होणार नाही. २०२० मध्ये अमेरिकेने आंतरराष्ट्रीय अवकाश कराराची घोषणा केली, यानुसार चंद्रावर ‘सेफ्टी झोन’ तयार करण्यासाठी कायदा तयार करता येईल. रशिया आणि चीन या करारात सहभागी झालेले नाहीत.
पाणी सापडले तर काय होईल?
नासा काय म्हणते? चंद्रावरील पाण्याचा पहिला निश्चित शोध २००८ मध्ये चंद्रयान-१ ने लावला होता. चंद्रयानाने चंद्राच्या पृष्ठभागावर विखुरलेले केंद्रित हायड्रॉक्सिल रेणू शोधले होते. पाणी जीवनासाठी आवश्यक आहे. ते हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे स्रोतदेखील असू शकते व रॉकेट इंधनासाठी वापरले जाऊ शकते.
हेलियम -३ इतके खास का आहे?
हेलियम-३ हे हेलियमचे एक आयसोटोप आहे जे पृथ्वीवर दुर्मीळ आहे, परंतु नासाचे म्हणणे आहे की चंद्रावर अंदाजे १० लाख टन हेलियम-३ आहे. याचा वापर करून अणुऊर्जा निर्मिती करता येऊ शकते. तो किरणोत्सर्गी नाही, त्यामुळे घातक कचरा निर्माण होणार नाही.