चर्चेसाठी दिवसभर बसेन; मोदींवरील ‘हल्ले’ थांबवा
By admin | Published: November 3, 2015 02:14 AM2015-11-03T02:14:37+5:302015-11-03T02:14:37+5:30
असहिष्णुतेच्या मुद्यावर व्यक्त केल्या जाणाऱ्या चिंतेबाबत माझी संबंधितांशी संपूर्ण दिवसभर बसून चर्चेची तयारी आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील शाब्दिक हल्ले थांबवा, असे खुले
नवी दिल्ली : असहिष्णुतेच्या मुद्यावर व्यक्त केल्या जाणाऱ्या चिंतेबाबत माझी संबंधितांशी संपूर्ण दिवसभर बसून चर्चेची तयारी आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील शाब्दिक हल्ले थांबवा, असे खुले आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सोमवारी पुरस्कारवापसी आणि निषेध नोंदविणाऱ्या नामवंत लेखक आणि कलावंतांना केले आहे.
वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्यावर सरकारवर होत असलेली टीका शांत करण्याच्या उद्देशाने आवाहन करताना ते म्हणाले की, प्रत्येक बाबीवर चर्चा करण्याची माझी तयारी आहे. मी दिवसभर बसेन. ते चर्चेसाठी समोर येत असल्यास मी त्यांचे स्वागत करेन. लेखक आणि कलावंतांना दिलेले हे अधिकृत निमंत्रण समजायचे काय? त्यावर राजनाथसिंह म्हणाले, होय, मी तयार आहे. त्यांनी चिंता स्पष्ट कराव्यात. त्यांनी काही सूचना केल्यास मी त्यांचे स्वागतच करेन.
संगीतात अविश्वास दूर करण्याची शक्ती -अमजद अली
संगीतात ऐक्य आणि प्रेमाची भावना बळकट करण्यासह अविश्वासाचे वातावरण दूर करण्याची क्षमता आहे, असे प्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांनी सोमवारी स्पष्ट केले. संगीत हे मनुष्याची मने जोडण्याचे एक माध्यम आहे. त्याद्वारे सर्व प्रकारचे आपपर भेद मिटू शकतात, असेही त्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘हर चीज में पीएम को टार्गेट बनाने का मतलब हमारी समझ में नहीं आ रहा है.’ मी अंतर्गत सुरक्षेसाठी जबाबदार आहे. त्यांनी मला लक्ष्य बनवावे. पंतप्रधान ही एक संस्था आहे. पंतप्रधानांवर शाब्दिक हल्ले केल्यामुळे देशाला लाभ होणार नाही.
राजनाथसिंह, केंद्रिय गृहमंत्री
वादात शाहरुख खानचीही उडी : तर ‘सांकेतिक रूपात’ पुरस्कार परत करणार
मुंबई : देशातील कथित असहिष्णुतेचा निषेध करण्यासाठी कलावंत, लेखक, चित्रपट निर्माते आणि शास्त्रज्ञांकडून आपले पुरस्कार परत करण्याचे सत्र सुरूच असताना आता या वादात बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान यानेही उडी घेतली आहे. देशात असहिष्णुता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गरज पडल्यास ‘सांकेतिक रूपात’ मीही पुरस्कार परत करू शकतो. पण तूर्तास तरी माझ्यापुढे तशी स्थिती आहे, असे मला वाटत नाही, असे पद्मश्रीप्राप्त शाहरुख सोमवारी म्हणाला.
शाहरुखने एका मुलाखतीत म्हटले आहे कि, देशात असहिष्णुता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोक विचार न करता बोलत आहेत. आपला देश एक धर्मनिरपेक्ष देश आहे, याचा कुठलाही विचार न करता ते बोलत सुटले आहेत. नवा भारत, आधुनिक भारत, विकास अशा सगळ्यांबाबत आपण बोलतो; पण प्रत्यक्षात या सर्व बाताच ठरतात.