टाटा सन्सला मिस्त्रींकडून हवी सर्व कागदपत्रे
By admin | Published: December 30, 2016 01:29 AM2016-12-30T01:29:14+5:302016-12-30T01:29:14+5:30
टाटा उद्योग समुहाचे पदच्युत अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी त्या पदावर असताना त्यांना उपलब्ध झालेली समुहातील कंपन्यांशी संबंधित सर्व गोपनीय कागदपत्रे परत करावीत
मुंबई : टाटा उद्योग समुहाचे पदच्युत अध्यक्ष सायरस मिस्त्री यांनी त्या पदावर असताना त्यांना उपलब्ध झालेली समुहातील कंपन्यांशी संबंधित सर्व गोपनीय कागदपत्रे परत करावीत आणि अशी कोणतीही माहिती यापुढे कुठेही उघड न करण्याची लेखी हमी ४८ तासांत द्यावी, अशी कायदेशीर नोटीस टाटा सन्सने मिस्त्री यांना गुरुवारी पाठविली.
गेल्या तीन दिवसांत टाटांनी मिस्त्रींना बजावलेली ही दुसरी नोटीस आहे. यामध्ये टाटा सन्सने मिस्त्रींवर समुहातील कंपन्यांशी संबंधित संवेदनशील कागदपत्रे पूर्वसंमतीशिवाय जवळ बाळगून बाहेर नेल्याचा तसेच गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप केला आहे.
अध्यक्षपदावरून दूर करण्याच्या विरोधात राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे केलेल्या याचिकेत मिस्त्री यांनी कंपन्यांच्या अंतर्गत कामकाजासंबंधीची अनेक कागदपत्रे सहपत्रे म्हणून जोडली आहेत. त्यावरून टाटा सन्सने त्यांना या दोन नोटिसा पाठवून यापुढे गोपनीयतेचा भंग न करण्याची हमी मागितली आहे. (विश्ष प्रतिनिधी)