Narada Sting Case: सीबीआयच्या विशेष कोर्टाकडून तृणमूलच्या चारही नेत्यांना जामीन; ममतांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 07:42 PM2021-05-17T19:42:57+5:302021-05-17T19:48:30+5:30
Narada Sting Case: नारदा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तृणमूलच्या चार नेत्यांना कोर्टाकडून जामीन
Next
कोलकाता: नारदा स्टिंग प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयानं तृणमूल काँग्रेस पक्षाच्या चारही नेत्यांना जामीन दिला आहे. सीबीआयनं आज मंत्री फिरहाद हकीम, मंत्री सुव्रत बॅनर्जी, आमदार मदन मित्रा, सोवन चॅटर्जी यांना अटक केली होती. या सर्व नेत्यांना न्यायमूर्ती अनुपम मुखर्जी यांच्या नेतृत्त्वाखालील विशेष सीबीआय न्यायालयानं जामीन दिला. त्यामुळे तृणमूल काँग्रेसला काहीसा दिलासा मिळाला आहे.
All four leaders - the then ministers of West Bengal govt - arrested by CBI in Narada case have been granted bail by the Court.
— ANI (@ANI) May 17, 2021
पश्चिम बंगालमध्ये काही दिवसांपूर्वी निवडणूक झाली. त्यात तृणमूल काँग्रेसनं पुन्हा बाजी मारली आणि सत्ता कायम राखली. निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच राज्यात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. ममतांचं सरकार स्थापन होताच, त्यांच्या मंत्र्यांविरोधात नारदा घोटाळ्याची (Narada sting case) पुन्हा चौकशी सुरु झाली आहे. या घोटाळ्यातील आरोपी आणि ममतांचे कॅबिनेट मंत्री फिरहाद हकीम, सुव्रत मुखर्जी, आमदार मदन मित्रा, सोवन चटर्जी यांच्या घरावर सीबीआयने (CBI) छापेमारी केली. यानंतर चारही नेत्यांना सीबीआयने कार्यालयात नेलं. हे समजताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील सीबीआय कार्यालयात दाखल झाल्या.
तृणमूल काँग्रेसच्या चार नेत्यांना सीबीआयनं ताब्यात घेतल्याचं समजताच बंगालच्या राजकारणात भूकंप झाला. नेत्यांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू झालं. यातच ममता या सीबीआय कार्यालयात गेल्या. या साऱ्या घडामोडींमध्ये सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी ममतांच्या मंत्र्यांची चौकशी केली.
सीबीआयच्या टीमनं सोमवारी सकाळी परिवहन मंत्री आणि कोलकाता नगर पालिकेचे अध्यक्ष फिरहाद हकीम यांच्या घरावर छापा टाकला. थोडा वेळ शोध घेऊन हकीम यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं. तेव्हा हकीम यांनी आपल्याला नारदा घोटाळ्यात अटक केली जात असल्याचं सांगितलं. यामुळे त्यांच्या समर्थकांनी हकीम यांच्या घरासमोर आंदोलन करण्यास सुरुवात केली.