‘निर्भया’च्या चारही गुन्हेगारांना १ फेब्रुवारीला फासावर लटकविणार; नवे डेथ वॉरंट जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 04:57 AM2020-01-18T04:57:12+5:302020-01-18T04:57:32+5:30
दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला
नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही गुन्हेगारांना आता २२ जानेवारीऐवजी १ फेब्रुवारी रोजी फासावर लटकविण्यात येणार आहे. तसे डेथ वॉरंट दिल्लीच्या न्यायालयाने शुक्रवारी जारी केले. त्यानुसार, चौघांना १ फेबुवारी रोजी सकाळी ६ वाजता फासावर चढविण्यात येईल.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीशकुमार अरोरा यांनी हे डेथ वॉरंट जारी केले. या प्रकरणातील एक दोषी मुकेश सिंह याने फाशीची २२ जानेवारी ही तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली होती. त्यावर सुनावणीच्या वेळी सरकारी वकिलांनी मुकेशसिंहचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला आहे, असे न्यायालयास सांगितले. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे २२ जानेवारीला चौघांना फाशी देणे शक्य नसल्याने, न्या. अरोरा यांनी नव्या तारखेचे डेथ वॉरंट जारी केले. त्या आधी मुकेशसिंह याने केलेला दयेचा अर्ज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी फेटाळून लावला. या निर्णयामुळे अन्य तिघांची फाशीही राष्ट्रपती रद्द करणार नाहीत, असे स्पष्ट झाले आहे. मुकेशसिंह याचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींना पाठवितानाच तो फेटाळावा, अशी शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रपतींना गुरुवारी केली होती. शुक्रवारी रात्री पवन गुप्ता या दोषीनेही दयेचा अर्ज केला.
मुकेशसिंहनंतर अन्य तिघे दोषीही दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडे करण्याची शक्यता आहे. मात्र मुकेशसिंहच्या बाबतीत जो निर्णय राष्ट्रपतींनी दिला, तसेच अन्य तिघांच्या बाबतीत घडेल. मुकेशसिंह याने दोन दिवसांपूर्वी दयेचा अर्ज केला होता. निर्भया बलात्कार व हत्याप्रकरणी मुकेशसिंह, विनय शर्मा, अक्षयकुमार सिंह, पवन गुप्ता, रामसिंह व एक अल्पवयीन मुलगा अशा एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली होती. खटल्याचे कामकाज सुरू असताना रामसिंह याने तिहार तुरुंगात आत्महत्या केली. अल्पवयीन आरोपीला तीन वर्षे बालसुधारगृहामध्ये ठेवण्यात आले. त्याची २०१५मध्ये मुक्तता झाली. मात्र जीवाला धोका असल्यामुळे त्याला अज्ञात ठिकाणी पाठविण्यात आले आहे. अन्य चौघांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.
वडिलांकडून स्वागत
मुकेशसिंह याचा दयेचा अर्ज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळल्याच्या निर्णयाचे निर्भयाच्या वडिलांनी स्वागत
केले आहे. ते म्हणाले की, दयेचा अर्ज फेटाळला गेल्याने चौघांना लवकर फाशी दिली जाण्याची शक्यता वाढली आहे. दयेचा अर्ज फेटाळला जाणार याची आम्हाला खात्री होती.