Hyderabad Encounter : हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 07:51 AM2019-12-06T07:51:01+5:302019-12-06T11:27:19+5:30
Hyderabad Case : हैदराबाद बलात्कार पीडितेचे जळालेल्या मृतदेहाचे फोटो पाहून संपूर्ण देश हादरला होता.
हैदराबाद - हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तपासावेळी आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले होते. त्यावेळी पोलिसांच्या तावडीतून या आरोपींनी निसटण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही ते पळून जात होते. अखेर पोलिसांनी गोळीबार केला. त्यात या चारही आरोपींचा मृत्यू झाला आहे.
Telangana Police: All four people accused in the rape and murder of woman veterinarian in Telangana have been killed in an encounter with the police. More details awaited. pic.twitter.com/AxmfQSWJFK
— ANI (@ANI) December 6, 2019
हैदरबाद बलात्कार पीडितेचे जळालेल्या मृतदेहाचे फोटो पाहून संपूर्ण देश हादरला होता. याप्रकरणी सायबराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली होती. पीडितीच्या हत्याप्रकरणी पोस्ट मार्टम अहवालातून धक्कादायक खुलासा समोर आला होता.
प्राथमिक माहितीनुसार 4 जणांनी पीडितीवर सामूहिक बलात्कार केला, त्यावेळी जवळपास 7 तास पीडितीला बांधून ठेवण्यात आले होते. बुधवारी रात्री 9.30 वाजल्यापासून गुरुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत पीडितीवर अत्याचार करण्यात आले. या चौघांनी प्रियांकाला टॉर्चर केल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं असून ट्रक ड्रायव्हरांसह त्यांच्या क्लिनर्सनी पीडितीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याचं समजतंय.
पीडित शादनगर येथील आपल्या घरातून शम्शाबाद स्थित कोल्लूर गावातील एका पशु चिकित्सालयात (वेटरनरी रुग्णालय) नोकरीसाठी निघाली होती. दरम्यान, पीडितीची स्कूटर शादनगर टोलनाक्याजवळ पंक्चर झाली होती. तिने तिची स्कूटर टोलनाक्याजवळ लावली आणि टॅक्सी करून ती पुढे ऑफिसला गेली. कामावरून परतत असताना पीडित स्कूटरजवळ आली तेव्हा बुधवारी सायंकाळी तिने बहिणीला कॉल करून स्कुटर रिपेअर करण्याबाबत माहिती दिली. बहिणीने टॅक्सी करून परत ये असं सांगितले,तेव्हा पीडितीने काही माणसं माझी मदत करायला तयार आहेत असं सांगितलं. थोड्यावेळाने कॉल करते असं सांगून पीडितीने फोन ठेवला आणि त्यानंतर तिचा फोन बंद पडला. तिचं बहिणीशी रात्री ९. १५ वाजताच्यादरम्यान शेवटचं बोलणं झालं होतं.
दरम्यान, स्कूटरजवळ उभी असताना तिने तिच्या बहिणीला फोन केला होता. मी जिथे उभी आहे तिथे मला भीती वाटते आहे असं तिने बहिणीला सांगितलं होतं. या संभाषणानंतर तिचा फोन बंद झाला. शेवटी पीडितीच्या कुटुंबीयांनी शम्शाबाद पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळची ६ वाजता दुधवाल्याला जळालेला मृतदेह आढळून आला होता.