पथलगढी आंदोलकांनी अपहरण केलेल्या चारही पोलिसांची स्थानिकांच्या मदतीने ७२ तासांत सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 05:05 AM2018-06-30T05:05:12+5:302018-06-30T05:05:15+5:30
झारखंडमधील भाजपाचे खासदार करिया मुंडा यांच्या खुंटी जिल्ह्यातील निवासस्थानातून तीन दिवसांपूर्वी अपहरण केलेल्या चार पोलिसांची सुटका
सोनाली दास
रांची : झारखंडमधील भाजपाचे खासदार करिया मुंडा यांच्या खुंटी जिल्ह्यातील निवासस्थानातून तीन दिवसांपूर्वी अपहरण केलेल्या चार पोलिसांची सुटका करण्यात तपास यंत्रणांना शुक्रवारी यश आले आहे. पथलगढी आंदोलनाच्या समर्थकांनी या पोलिसांना पळवून नेले होते.
राज्याचे पोलीस महासंचालक डी. के. पांडे यांनी सांगितले की, स्थानिक लोकांच्या मदतीमुळेच विनोद केरकेट्टा, सिअन सुरिन, नागेंद्र सिंह, सुबोध कुजूर या चारही पोलिसांची सुटका करणे शक्य झाले.
तीन पोलिसांचे अपहरण झाले असावे व चौथा रजेवर आहे, असे गुरुवारपर्यंत सांगण्यात येत होते. पण चौथ्यालाही ाळवून नेल्याचे नंतर स्पष्ट झाले. पथलगढी आंदोलकांनी २६ जून रोजी खासदार करिया मुंडा यांच्या अनिंगडा-चांदिहदिहच्या घरी मोर्चा नेला व तेथून चारही पोलिसांचे अपहरण केले होते. (वृत्तसंस्था)
काय आहे पथलगढी आंदोलन?
पथलगढी आंदोलनातील लोक हे ग्रामसभांना स्वायत्त संस्था समजतात. झारखंडमधील आदिवासी क्षेत्रातील गावांमध्ये केंद्र वा राज्य सरकारचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, अशी पथलगढी आंदोलनाची भूमिका आहे. त्यामुळे ते सरकारी कर्मचारी किंवा पोलिसांना गावात येऊच देत नाहीत. तसे फलकच गावाबाहेर लावण्यात आले आहेत. यापैकी कोणी गावात यायचा प्रयत्न केला तर त्याच्यावर दगडफेक केली जाते. त्यासाठी गावाच्या वेशीवर दगडाचे कुंपण घालण्यात येते. आमच्या गावात आमचेच कायदे चालतील, भारत सरकारच्या कायद्यांना आम्ही जुमानत नाही अशी भूमिका पथलगढी आंदोलकांची आहे.
पाच महिला
कार्यकर्त्यांवर बलात्कार
पोलिसांचे अपहरण करणाऱ्यांची माहिती देणाºयांना पन्नास हजार रुपयांचे बक्षीस झारखंड सरकारने गुरुवारी जाहीर केले होते. झारखंडमधील कोचांग गावात पथनाट्याद्वारे सामाजिक जागृती करण्यासाठी गेलेल्या पाच महिला कार्यकर्त्यांवर गेल्या आठवड्यातच पथलगढी आंदोलनाच्या समर्थकांनी बलात्कार केला होता. त्यांचेही आधी अपहरण करण्यात आले होते.