सर्व मुलींना ‘व्हॅलेंटाईन डे’पूर्वी बॉयफ्रेंड आवश्यक! कॉलेजमध्ये लागली फेक नोटीस, पोलिसांत तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 06:51 AM2023-01-25T06:51:09+5:302023-01-25T06:51:46+5:30
एसव्हीएम स्वायत्त महाविद्यालयाच्या प्राचार्यांची बनावट स्वाक्षरी असलेली नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
पारादीप (ओडिशा) :
ओडिशाच्या जगतसिंगपूर जिल्ह्यातील एका महाविद्यालयाने संस्थेच्या सर्व विद्यार्थिनींना १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’च्या आधी बॉयफ्रेंड असणे अनिवार्य करण्याचे निर्देश देणाऱ्या बनावट नोटीसबद्दल पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
एसव्हीएम स्वायत्त महाविद्यालयाच्या प्राचार्यांची बनावट स्वाक्षरी असलेली नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. याबाबत प्राचार्य बिजय कुमार पात्रा म्हणाले, “आम्ही बनावट नोटीस पाहिली आहे.
महाविद्यालयाची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी...
- काही उपद्रवी तत्त्वांनी ती व्हायरल केली आहे. आमच्या महाविद्यालयाची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी हे केले गेले आहे. पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.” आपली प्रतिमा डागाळण्यासाठी आपल्या स्वाक्षरीचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोपही मुख्याध्यापकांनी केला आहे.
- जगतसिंगपूर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने मुख्याध्यापकांच्या तक्रारीची पुष्टी केली आणि या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले.
गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड नसेल, तर होईल कारवाई
- ‘व्हॅलेंटाईन डे’च्या मागेपुढे अशा प्रकारच्या बनावट नोटिसा व्हायरल करण्याचा फंडा तसा जुनाच आहे.
- २०१८ मध्ये चंडीगड विद्यापीठाचा असाच एक आदेश व्हायरल झाला होता. त्यातही ‘जो कोणी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडशिवाय विद्यापीठात दिसेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि दंड आकारला जाईल, असा इशारा दिला होता.
म्हणे हे सगळे सुरक्षिततेसाठी...
- एसव्हीएम महाविद्यालयाच्या प्राचार्यांची स्वाक्षरी असलेली नोटीस दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून ज्यामध्ये विद्यार्थिनींना १४ फेब्रुवारीला त्यांच्या बॉयफ्रेंडसोबत महाविद्यालयात येण्यास सांगण्यात आले, एवढेच नाही तर “हे सुरक्षेच्या उद्देशाने केले जात आहे.
- विद्यार्थिनींना बॉयफ्रेंडसोबत क्लिक केलेला फोटो दाखवणेही आवश्यक आहे,’ असे फर्मानही त्यात सोडले आहे. दरम्यान, या व्हिडिओमुळे विद्यार्थ्यांत घबराट निर्माण झाली. नोटीसच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येऊ लागले. प्राचार्यांनी ही नोटीस बनावट असल्याचे स्पष्ट केल्याने विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला.
चौकशीत हे पत्र बनावट असल्याचे समोर आले. विद्यापीठातीलच एकाने बनावट पत्र टाईप करून सोशल मीडियावर व्हायरल केले होते. अर्थात त्याची विद्यापीठातून हकालपट्टी करण्यात आली.