गांधी हत्येसह महत्त्वाच्या सर्व फाईल्स सुरक्षित
By admin | Published: July 15, 2014 02:03 AM2014-07-15T02:03:13+5:302014-07-15T02:03:13+5:30
नरेंद्र मोदी सरकारकडून इतिहासाची हेळसांड होत नसल्याचा दावा करून गृहमंत्री राजनाथसिंग यांनी, म. गांधी यांच्या हत्येसह अन्य ऐतिहासिक महत्त्वाच्या फाईल्स सुरक्षित असल्याचा निर्वाळा आज राज्यसभेत दिला
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारकडून इतिहासाची हेळसांड होत नसल्याचा दावा करून गृहमंत्री राजनाथसिंग यांनी, म. गांधी यांच्या हत्येसह अन्य ऐतिहासिक महत्त्वाच्या फाईल्स सुरक्षित असल्याचा निर्वाळा आज राज्यसभेत दिला. नरेंद्र मोदी यांनी फाईल्स नष्ट करण्याआधी त्यांचे डिजिटलीकरण करण्याचे निर्देश दिले असल्याचे स्पष्ट करून राजनाथसिंगांनी, फाईल्स नष्ट करण्याची प्रक्रिया संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्याच काळात सुरू झाल्याचेही नमूद केले. सरकार इतिहासाची निरंतरता कायम राखण्यासाठी कटिबद्ध असून त्यात कुठलीही हेळसांड केली जाणार नाही असा दावा त्यांनी केला.
गृहमंत्रालयातील ज्या फाईल्स नष्ट करण्यात आल्या त्यांना कार्यालयाच्या प्रक्रिया नियमांनुसारच नष्ट केले गेले आहे, असे सिंग पुढे म्हणाले. या प्रक्रियेनुसार कार्यालयातील फाईल्सला तीन श्रेणीत विभागले जाते. तिसऱ्या श्रेणीतील फाईल्सला १० वर्षांच्या काळानंतर तिचे पूर्णपणे समीक्षण करून नष्ट केले जाते.
राज्यसभेतील एका सदस्याने प्रसिद्धी माध्यमांनी दिलेल्या वृत्ताच्या आधारे मागील आठवड्यात, पंतप्रधानांच्या सूचनेनुसार दीड लाख फाईलींना नष्ट केल्याचे सांगून त्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येशी संबंधित फाईलही असल्याचे म्हटले होते. त्यानंतर गृहमंत्र्यांनी या कथनाचे खंडन करणारे एक स्पष्टीकरणही दिले होते.
सदस्यांना हवे असेल तर नष्ट केलेल्या एकेका फाईलमधील मसुदा आपण काढून देऊ शकतो, असा दावाही सिंग यांनी पुढे केला आहे. नष्ट केलेल्या फाईल्सचे मायक्रो फिल्मिंग करण्याबाबत सरकारकडून कोणतीच सूचना आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोंडीच, फाईली नष्ट करण्याआधी त्यांचे स्कॅनिंग व मायक्रोफिल्मिंग केले जावे असे म्हटले असल्याचे सिंग यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)