दोन कुटुंबातील सर्व सदस्य संसाराचा मोह त्यागून घेणार दीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 12:25 PM2018-04-25T12:25:24+5:302018-04-25T12:25:24+5:30
मुंबई व सूरतमधील दोन कुटुंबाच्या घरातील सर्वच सदस्य दीक्षा घेणार असल्याचं समोर येतं आहे.
अहमदाबाद- जैन कुटुंबातील एक सदस्य किंवा काही सदस्य दीक्षा घेत असल्याचं पाहायला मिळतं. अनेक तरूण मुलंही दीक्षा घेण्याच्या मार्गावर असल्याचंही पाहायला मिळतं आहे. पण आता मुंबई व सूरतमधील दोन कुटुंबाच्या घरातील सर्वच सदस्य दीक्षा घेणार असल्याचं समोर येतं आहे. संसाराचा मोह त्यागून दोन्ही कुटुंबातील सर्व सदस्यांनी दीक्षा घेण्याचं ठरवलं आहे. अहमदाबादच्या साबरमतीजवळ दीक्षा घेण्याचा हा भव्य कार्यक्रम होणार आहे.
उत्तर गुजरातच्या बनासकांठाचे रहिवासी असलेले हीरा व्यापारी संजय शाह यांच्या 24 वर्षीय मुलगा दर्शिल याच्या मित्राने दीक्षा घेतल्यावर दर्शिलने तसं करायचं ठरवलं. मुलाने असं करु नये यासाठी दर्शिलच्या कुटुंबीयांनी अनेक प्रयत्न केले. तरिही त्याचा परिणाम झाला नाही. दर्शिलला पाहून त्याची बहिण पूजा हिलाही दीक्षा घेण्याची इच्छा निर्माण झाली. तिनेही दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. मुलांना पाहून आता त्यांच्या आई-वडिलांनीही दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. संजय शाह व पत्नी नीता शाह यांनीही दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसरीकडे मुंबईतील रहिवासी धर्मेश शाह यांचा मुलगा प्रत्युषने चार वर्षाआधी दीक्षा घेतली होती. त्यानंतर धर्मेशची मुलगी मैत्री हिनेही दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. मुलांच्या या निर्णयानंतर धर्मेश व त्यांची पत्नी केतु यांनीही दीक्षा घेण्याचं ठरवलं आहे. धर्मेश यांनी दोन वर्षांआधीच कपड्यांचा व्यावसाय बंद करायला सुरूवात केली होती. घरातील सर्वच जण दीक्षा घेणार असल्याचा आनंद असल्याचं धर्मेश यांनी म्हटलं.