शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’मध्ये सर्व विराेधी पक्षही उतरणार, देशभरातील ४०० संघटना सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2020 07:04 AM2020-12-07T07:04:51+5:302020-12-07T07:05:11+5:30
Farmers' 'Bharat Bandh : मंगळवारी, ८ डिसेंबर रोजी पुकारलेल्या भारत बंदमध्ये शेतकरी संघर्ष समन्वय समितीत देशभरातील ४०० शेतकरी संघटनांचा सहभाग आहे.
नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात अखिल भारतीयशेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवारी, ८ डिसेंबर रोजी पुकारलेल्या भारत बंदमध्ये काँग्रेससोबतच तृणमूल , राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काॅंग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय लोक दल, राष्ट्रीय लोक समता पार्टी (रालोसपा), समाजवादी पक्ष तसेच डावे पक्ष आदी विरोधी पक्ष सामील होणार आहेत.
शेतकरी संघर्ष समन्वय समितीत देशभरातील ४०० शेतकरी संघटनांचा सहभाग आहे. बंदमध्ये माकप, भाकप, सीपीआय (एमएल), रेव्होल्युशनरी सोशॅलिस्ट पार्टी (आरएसपी), ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक आदी पक्षही सहभागी होणार आहेत.
पाठिंबा देणारी राज्ये व सत्ताधारी पक्ष
महाराष्ट्र : शिवसेना, राष्ट्रवादी, काॅंग्रेस, पंजाब : काँग्रेस, पश्चिम बंगाल : तृणमूल काँग्रेस, राजस्थान : काँग्रेस,
नवी दिल्ली : आम आदमी पक्ष, छत्तीसगड : काँग्रेस, झारखंड : झारखंड मुक्ती मोर्चा, केरळ : डावी आघाडी
विजेंदरचा खेलरत्न परत करण्याचा इशारा; कलाकारांकडून समर्थन
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास खेलरत्न पुरस्कार परत करू, असे विजेंदरसिंग यांनी जाहीर केले आहे.
आंदोलनाला सोनू सूद, अभिनेत्री तापसी पन्नू, ऊर्मिला मातोंडकर, रिचा चड्ढा, स्वरा भास्कर, बॉक्सर विजेंदर सिंग, क्रिकेटपटू हरभजनसिंग आदींनी पाठिंबा दिला आहे.
अभिनेता-गायक दिलजीत दोसांझ यांनी आंदोलनाला पाठिंबा देत निदर्शकांना १ कोटी रुपयांची देणगीही दिली.
शरद पवार घेणार राष्ट्रपतींची भेट
शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारने न सोडवल्यास देशभरातील लोक या आंदोलनात उतरतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शरद पवार लवकरच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहेत.