भारतातील दहशतवादामागे पाकिस्तानची सगळी यंत्रणा

By admin | Published: October 18, 2016 04:44 AM2016-10-18T04:44:56+5:302016-10-18T04:44:56+5:30

पाकिस्तानची सगळी यंत्रणा ही दहशतवादाला खतपाणी घालणारी आहे, असा हल्ला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी केला.

All Pakistan machinery behind terrorism in India | भारतातील दहशतवादामागे पाकिस्तानची सगळी यंत्रणा

भारतातील दहशतवादामागे पाकिस्तानची सगळी यंत्रणा

Next


चंदीगढ : पाकिस्तानची सगळी यंत्रणा ही दहशतवादाला खतपाणी घालणारी आहे, असा हल्ला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी केला. ज्यांनी साप पाळले ते त्यांना चावणारच, असे ते म्हणाले.
पाकपुरस्कृत दहशतवादाच्या विरोधात भारत आहे, पण पाक नागरिकांच्या विरुद्ध नाही. दहशतवादाचे कारखाने नष्ट करण्यासाठी मोहीम चालविण्यासाठी मदत देण्याची आमची तयारी असल्याचे ते म्हणाले. संपादकांच्या परिषदेत ते येथे बोलत होते.
अहमदाबादमध्ये बोलताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले की, पाककडून युद्धविरामांचे उल्लंघन होत असून त्याला आपले लष्कर चोख प्रतिउत्तर देत आहे, सर्जिकल स्ट्राईक्सने देशाच्या सुरक्षेबद्दल भारतीयांच्या मनात संवेदनशीलता वाढवली आहे. सर्जिकल स्ट्राईक्सचे पुरावे द्या अशी मागणी अगदी पहिल्या दिवसापासून काही राजकारणी करीत आहेत, असे सांगून पर्रीकर म्हणाले की लष्कर जर काही सांगत असेल तर आम्ही त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. ‘नो अवर आर्मी’ कार्यक्रमात ते बोलत होते. पर्रीकर म्हणाले. (वृत्तसंस्था)
>
परिस्थिती सुधारताच सीआरपीएफ बरॅकमध्ये
काश्मीरमध्ये निमलष्कर दल हे नाईलाजाने तैनात करण्यात आले आहेत. परिस्थिती सामान्य झाल्यावर त्यांना बराकमध्ये (जवानांचे निवासाचे ठिकाण) परत पाठविले जाईल, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे. मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, आंदोलकांकडून होत असलेली तोडफोड आणि वाहनांना लक्ष्य केले जात असल्याने केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाला (सीआरपीएफ) तैनात करण्यात आले आहे. अशा घटनेत शहरात परिमपोरा येथे एका मुलीचा मृत्यू झाला.
परिस्थिती सुधारल्यानंतर आणि तोडफोडीच्या घटना कमी झाल्यानंतर सुरक्षा दलाची भूमिकाच कमी होईल. त्यामुळे त्यांना परत पाठविले जाईल. मूळात निमलष्करी दलाची नेमणूक ही सुरक्षेच्या दृष्टीने केली जाते. मुलांच्या भविष्याकडे पाहून पालकांनी सरकारला मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. पुढील महिन्यात परीक्षा आयोजित करण्याच्या निर्णयाविरुद्ध आंदोलन केले जात असल्याबाबत त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठीच परीक्षा वेळेवर घेण्यात येत आहेत.
प्रसंगी आम्ही ट्यूशनची व्यवस्था करू. पण, परीक्षा वेळेवरच घेतल्या जातील. राज्यातील महिला आणि मुली यांच्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहितीही त्यांनी दिली. महिलांसाठी वेगळी बससेवा, पोलीस स्टेशनही सुरू केले आहेत. तसेच, लाडली योजना सुरू करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या मुली आॅटोरिक्षाने प्रवास करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी स्कूटी खरेदीसाठी ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
>अनेक दुकाने उघडली
काश्मिरात सोमवारीही सामान्य जनजीवन सुरळीत होऊ शकले नाही. तथापि, प्रदीर्घ बंदला लोक कंटाळल्याची चिन्हे आहेत. फुटीरवाद्यांचे आवाहन धुडकावत शहराच्या आतील भागांत अनेक दुकाने उघडण्यात आज आली होती, तसेच रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढल्याचेही दिसून आले. लाल चौकातून जाणाऱ्या टीआरसी क्रॉसिंग रोडवर फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात स्टॉल लावले होते. रस्त्यांवरील खासगी वाहनांची वर्दळ वाढल्याने काही ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

Web Title: All Pakistan machinery behind terrorism in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.